sharad pawar sabha in sangli for vidhansabha elections 2024
तासगाव : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीमुळे जोरदार राजकारण रंगले आहे. प्रचारासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले असून प्रचार शेवटच्या टप्प्यामध्ये आला आहे. यंदाची विधानसभा निवडणूक ही दोन्ही युतींसाठी प्रतिष्ठेची मानली जात आहे. यामुळे महाविकास आघाडीचे नेते जोरदार प्रचारसभा, बैठका व रॅली करत आहेत. आता तासगावमध्ये शरद पवार यांची सभा पार पडली. महाविकास आघाडीचे उमेदवार राेहित पाटील यांच्यासाठी त्यांनी प्रचारसभा पार पडली.
यावेळी शरद पवार यांनी तुफान राजकीय टोलेबाजी केली. महायुती आणि देवेंद्र फडणवीस यांचा शरद पवार यांनी खरपूस समाचार घेतला. सभेमध्ये शरद पवार म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत आम्ही सत्तेसाठी नाही तर लोकांची कामे करण्यासाठी मते मागत आहोत. आजचे राज्यकर्ते मात्र पैशाचा गैरवापर करुन माणसे विकत घेतात आणि सत्ता मिळवत आहेत. निवडणुकीनंतर फडणवीसांच्या हातात सत्ता जाऊन द्यायची नाही, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, असे ठाम मत शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
लोकसभा निवडणुकीवेळी भाजपने 400 पारचा नारा दिला होता. मात्र भाजपला ते शक्य झाले नाही. यावरुन विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये देखील टीका केली जात आहे. सभेमध्ये शरद पवार म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेनुसार सत्ता मिळविण्यासाठी 274 खासदारांची गरज आहे. परंतु मोदी आणि शाह यांनी मात्र लोकसभेला 400 पार चा नारा दिला. हे बहूमत घटना बदलण्यासाठी आवश्यक आहे. यावरुनच त्यांच्या मनात काहीतरी वेगळा विषय असावा, ही बाब ओळखून देशातील सर्व भाजप विरोधकांनी एकत्र येऊन त्यांना रोखले. देशाची सत्ता भाजपची आहे, परंतू घटना बदलण्याची ताकद त्यांच्याकडे आता राहिली नाही, असा घणाघात शरद पवार यांनी केला.
निवडणुकीच्या आधी महायुतीकडून राज्यामध्ये लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आली. यावरुन टीका करताना शरद पवार म्हणाले की, महिलांना महिन्याला 1500 रुपये द्यायला आमची काहीच हरकत नाही. पण तिची सुरक्षा सर्वात महत्वाची आहे. दोन वर्षात 67 हजार 381 महिलांवर अत्याचार झाले आहेत. दर पाच तासाला एका महिलेवर अत्याचार होत आहे. हजारो महिला गायब झालेल्या आहेत, ही चिंतेची बाब आहे, अशी परिस्थिती शरद पवार यांनी मांडली.
राजकीय घडामोडींच्या बातमी जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
संजय पाटील विश्वासघातकी
खासदार शरद पवार म्हणाले, “संजय पाटील यांना विधानपरिषेवर आमदार करावे, असा आग्रह आर. आर. पाटील यांनी धरला होता. मी त्याच वेळी आर. आर. पाटील यांना सांगितले होते की, त्यांना आमदार करू नका. कारण हा माणूस विश्वास ठेवण्याच्या पात्रतेचा नाही आणि शेवटी तेच खरं झालं. ज्या दिवशी विधानपरिषदेचा कार्यकाल संपला त्याच दिवशी त्यांनी पक्ष सोडला. भाजपमधून खासदार झाले आणि आता भाजप सोडली.”
आता ग्रामपंचायत लढवावी लागेल
यावेळी खासदार विशाल पाटील म्हणाले, “राज्यात वसंतदादा व शरद पवारांना मानणाऱ्या लोकांच्या पाठीशी नेहमीच आर. आर. पाटील उभे राहिले. सत्तेशिवाय संजय पाटील यांना जमतं नाही, म्हणून त्यांनी पक्ष बदलून उमेदवारी घेतली. सत्तेसाठी मुलाला थांबवून स्वत:उभे राहिले. संजय पाटील यांना आता ग्रामपंचायत निवडणूक लढवावी लागेल,” असा टोला विशाल पाटील यांनी लगावला आहे.