Dhanraj Mahale rebelled in Dindori assembly constituency
दिंडोरी : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून उमेदवारी जाहीर करण्यात येत आहे. महायुतीने उमेदवार जाहीर करण्यामध्ये बाजी मारली आहे. अजित पवार गट, शिंदे गट व भाजपची उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. पहिल्या यादीमध्ये अजित पवार गटाचे नेते नरहरी झिरवाळ यांना दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली. मात्र आता महायुतीमध्ये या मतदारसंघामध्ये बंडखोरी झाली आहे.
नाशिकमधील दिंडोरी मतदारसंघामध्ये राजकीय वातावरण तापले आहे. नरहरी झिरवाळ यांना महायुतीमध्ये उमेदवारी मिळाल्यानंतर शिंदे गटाच्या नाराज पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. शिंदे गटाचे नेते धनराज महाले यांनी बंडखोरीचा आक्रमक पवित्रा घेतला आहे. दिंडोरी मतदारसंघातून शिंदे गटाकडून धनराज महाले इच्छुक होते. मात्र महायुतीच्या जागावाटपामध्ये हा मतदारसंघ अजित पवार गटाकडे आला. त्यांच्याकडून विद्यमान आमदार नरहरी झिरवाळ यांना संधी देण्यात आली.
दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून नरहरी झिरवाळ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सलग तिसऱ्यांदा नरहरी झिरवाळ दिंडोरी मतदार संघातून लढणार आहेत. त्यांना तिसऱ्यांना उमेदवारी देण्यात आली असून विजयाची हॅटट्रीक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रचार देखील दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून झाला होता. झिरवाळ यांच्या कुटुंबामध्ये बंड होईल अशी शक्यता होती. नरहरी झिरवाळ यांच्या विरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून त्यांचे पुत्र गोकुळ झिरवाळ लढतील, अशी चर्चा होती. मात्र, गोकुळ झिरवाळ माझंच काम करतील, असा खुलासा गोकुळ झिरवाळ यांनी केला आहे.
नरहरी झिरवाळ यांचे सूचक विधान
नरहरी झिरवाळ यांनी उमेदवारी अर्ज देखील जाहीर केला आहे. त्यानंतर झिरवाळ यांनी विजयाचा विश्वास व्यक्त करताना शरद पवार यांचा आशिर्वाद असल्याचे देखील म्हटले. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये एकच चर्चांना उधाण आले. ‘राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते व पदाधिकाऱ्यांच्या बळावर मी उमेदवारी घेतली आहे. राष्ट्रवादी पक्षामध्ये दोन गट असले तरी देखील मला जेष्ठ नेते शरद पवार यांचे दुरुन आशिर्वाद आहे,’ असे वक्तव्य नरहरी झिरवाळ यांनी केले आहे. त्यामुळे नरहरी झिरवाळ यांना शरद पवार यांचा पाठिंबा आहे का असा सवाल उपस्थित केला जात आहे.