Shinde group leader Ramdas Kadamtargeted Ajit over CM of Maharashtra in mahayuti
मुंबई : राज्यामध्ये जोरदार राजकारण रंगले आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुती लगेचच सरकार स्थापन करेल अशी अपेक्षा होती. मात्र एकतर्फी मतदान मिळवून देखील महायुतीने सरकार अद्याप सरकार स्थापनेचा दावा केलेला नाही. मुख्यमंत्रिपदावरुन महायुतीमध्ये चर्चा सुरु आहे. यामुळे नाराजी नाट्य देखील सुरु आहे. यामध्ये आता एकनाथ शिंदे यांनी देखील मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सुपूर्द केला आहे. आता एकनाथ शिंदे हे काळाजीवाहू मुख्यमंत्री आहेत. मात्र पुढील महायुतीच्या सरकारमध्ये कोण मुख्यमंत्री होणार यावरुन राजकारण रंगले आहे.
मुख्यमंत्रिपदावरुन चर्चा सुरु असताना शिंदे गटाचे नेते आक्रमक भूमिका घेत आहेत. सोशल मीडियावर देखील शिंदे गटाचे नेते एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याची जोरदार मागणी करत आहेत. तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपला देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री व्हावेत अशी जोरदार मागणी आहे. यामध्ये आता शिंदे गटाच्या नेत्यांनी अजित पवारांना धारेवर धरले आहे. शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी एका वाहिनीशी संवाद साधला. ते म्हणाले की, “भाजपाच्या लोकांना देवेंद्र फडणवीस आणि आमच्या कार्यकर्त्यांना एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत, असे वाटते. अजित पवार हे तर शरण गेले असून त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदासाठी पाठिंबा दिला आहे. त्यांच्यामुळे आमची बार्गेनिंग पॉवर त्यांनी संपवली, हा भाग वेगळा. मुख्यमंत्रिपदावरून कुणी, कितीही, काहीही प्रयत्न केले तरी आमची महायुती अभेद्य राहणार आहे,” असे मत रामदास कदम यांनी मांडले आहे.
अजित पवारांमुळे एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपद मिळण्यात अडचण येणार असल्याचे मत रामदास कदम यांनी आपल्या वक्तव्यामधून व्यक्त केले. पुढे रामदास कदम म्हणाले की, “निवडणूका एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढविली गेली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास ठेवून लढाई लढली आणि मोठ्या प्रमाणात यश मिळवून दिलं. आता झुकते माप कुठे टाकायचे, हे पक्षश्रेष्ठींच्या हातात आहे,” असे स्पष्ट मत रामदास कदम यांनी व्यक्त केले.
राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर
ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत यांंनी महायुतीवर जोरदार निशाणा साधला. खासदार राऊत म्हणाले की, “तीन पक्षांच्या या महायुतीला सैतानी बहुमत मिळाले आहे. एवढं मोठं यश मिळूनही जर का मुख्यमंत्री कोण हे निश्चित होत नसेल तर देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा एकमेकांच्या तंगड्यांमध्ये तंगडं अडकवण्याचा आणि छातीवर बसण्याचा कार्यक्रम पडद्यामागे सुरु आहे. “दिल्लीचे जे शूरवीर आहेत, भाजपचे नेतृत्व, त्यांनी डोळे वटारले की आत्तापर्यंत सगळे गप्प बसत होते. पण त्यांनी महाराष्ट्रामध्ये जे बंडखोर, जी भुतं निर्माण केलीत ती आता त्यांच्या वटारलेल्या डोळ्यांना पाहून गप्प बसत नाहीत. ते मोदी आणि शहानांच आव्हान देत आहेत असंही दिसतंय,” असा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे.