
‘मेहनत कलाकाराच्या हातात, पण योग्य संधी मिळणे नशिबाची गोष्ट’; अभिनेता विश्वनाथ कुलकर्णीने सांगितला ‘लक्ष्मी’चा प्रवास
मनुष्य आणि प्राणी यांच्यातील भावनिक बंधावर आधारित असलेल्या ‘लक्ष्मी’ची श्री दादासाहेब फाळके इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलच्या Top 50 Short Films मध्ये निवड झाली आहे. विशेष म्हणजे, हा विश्वनाथचा पहिलाच लघुपट असून हिंदी प्रोजेक्टमध्ये मुख्य भूमिका साकारण्याचीही त्यांची ही पहिलीच संधी आहे.
‘लक्ष्मी’मध्ये कांजी आणि मंजू या विवाहित दाम्पत्याचे आयुष्य दाखवण्यात आले आहे. त्यांच्या जीवनात ‘लक्ष्मी’ या गायीचे आगमन होते आणि त्यानंतर त्यांच्या आयुष्यात महत्त्वपूर्ण बदल घडतात. लक्ष्मी ही केवळ कथेतील एक प्राणी व्यक्तिरेखा न राहता लघुपटाचा भावनिक केंद्रबिंदू बनते. लक्ष्मीसोबत कांजीचे निर्माण झालेले नाते आणि त्याचवेळी मंजूसोबतच्या नात्यातील त्याचा भावनिक प्रवास या कथेत महत्त्वाचा ठरतो.
कांजीच्या भूमिकेसाठी विश्वनाथ कुलकर्णीने दोन दृश्यांचे ऑडिशन दिले होते. दोन्ही दृश्यांमध्ये कांजीच्या व्यक्तिमत्त्वाच्या वेगवेगळ्या भावनिक बाजू होत्या. एका दृश्यामध्ये कांजी लक्ष्मीचे आनंदाने कौतुक करताना दिसतो, तर दुसऱ्या दृश्यात कांजी आणि मंजू यांच्यातील भावनिक नात्यावर भर देण्यात आला होता. मात्र ऑडिशन दिल्यानंतर भूमिका आपल्याला मिळेल की नाही, याचा सातत्याने विचार करण्याऐवजी विश्वनाथने पुढच्या कामाकडे लक्ष देण्याचा निर्णय घेतला.
दहा वर्षांहून अधिक काळ अभिनय क्षेत्रात काम करताना ऑडिशनकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलल्याचे विश्वनाथ सांगतो. त्याच्या मते, कलाकाराच्या हातात व्यक्तिरेखा समजून घेणे, तिच्या भावना आत्मसात करणे आणि ऑडिशनमध्ये आपल्या क्षमतेनुसार सर्वोत्तम अभिनय करणे एवढेच असते. मात्र भूमिका मिळण्यासाठी केवळ मेहनत पुरेशी नसते. त्याच भूमिकेसाठी अनेक प्रतिभावान कलाकार प्रयत्न करत असतात. त्यामुळे ऑडिशन दिल्यानंतर निकालाचा सतत विचार करण्याऐवजी पुढील संधीकडे वळणे अधिक योग्य असल्याचे विश्वनाथचे म्हणणे आहे.
कांजीच्या भूमिकेसाठी इतर कलाकारांचाही विचार करण्यात आला होता. मात्र विश्वनाथचे ऑडिशन, व्यक्तिरेखेसाठी त्याची योग्यता आणि त्याने यापूर्वी केलेले काम या सर्व बाबींचा विचार करून अखेर त्याची निवड करण्यात आली. लघुपटाचे सिनेमॅटोग्राफर शशांक भालेराव यांनी विश्वनाथचे यापूर्वीचे काम पाहिले होते. कांजीची भूमिका तो प्रभावीपणे साकारू शकतो, असा विश्वास त्यांनी दिग्दर्शकाकडे व्यक्त केला होता.
“या सगळ्या गोष्टी योग्य वेळी एकत्र आल्या आणि मला ही भूमिका मिळाली. माझ्यासाठी हे केवळ ऑडिशनपुरते मर्यादित नव्हते; गेल्या अनेक वर्षांत केलेली मेहनत आणि त्या विशिष्ट वेळी साथ मिळालेले नशीब याचा हा परिणाम होता,” असे विश्वनाथ सांगतो.
‘लक्ष्मी’ विश्वनाथ कुलकर्णीसाठी अनेक अर्थांनी खास ठरला. हा त्याचा पहिलाच लघुपट आहे. त्याचबरोबर हिंदी प्रोजेक्टमध्ये मुख्य भूमिका साकारण्याचीही त्याची ही पहिली संधी ठरली. अनुभवी आणि प्रतिभावान अभिनेत्रीसोबत काम करण्याची संधी मिळाल्याबद्दलही त्याने आनंद व्यक्त केला. कलाकार म्हणून अशा प्रकारची संधी मिळणे हा सुंदर अनुभव असल्याचे विश्वनाथ मानतो.
‘लक्ष्मी’च्या वाटचालीत आणखी एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे श्री दादासाहेब फाळके इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलच्या Top 50 Short Films मध्ये झालेली निवड. त्यामुळे या लघुपटाला फिल्म फेस्टिव्हलच्या व्यासपीठावरही ओळख मिळाली आहे. फिल्म फेस्टिव्हलसोबत डिजिटल माध्यमांवरही ‘लक्ष्मी’ला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळत आहे. लघुपट YouTube वर 1 मिलियन व्ह्यूजच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे सांगण्यात आले आहे.
‘लक्ष्मी’च्या कमेंट सेक्शनमध्ये प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या प्रतिक्रियांबद्दल विश्वनाथने समाधान व्यक्त केले आहे. कलाकाराने साकारलेल्या भूमिकेशी आणि कथेतील भावनांशी प्रेक्षक जोडले जात असल्याचे पाहणे आनंद देणारे असल्याचे त्याचे म्हणणे आहे. पहिला लघुपट, हिंदीतील पहिली मुख्य भूमिका, कांजीसारखी भावनिक व्यक्तिरेखा, फिल्म फेस्टिव्हलमधील निवड आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर मिळणारा प्रतिसाद अशा अनेक गोष्टींमुळे ‘लक्ष्मी’ विश्वनाथ कुलकर्णीच्या अभिनय कारकिर्दीतील एक महत्त्वाचा आणि अर्थपूर्ण टप्पा ठरला आहे.
Salman Khan Gym Fire: सलमानच्या जिममध्ये आगीचा थरार! अग्निशमन दल घटनास्थळी, मोठी अपडेट समोर