
( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)
Allu Arjun Fans: भारताचा पॅन-इंडिया सुपरस्टार अल्लू अर्जुन केवळ आपल्या दमदार अभिनयासाठी आणि हिट चित्रपटांसाठीच नव्हे, तर सामाजिक कार्यांसाठीही ओळखला जातो. आता त्यांच्या चाहत्यांनीही सामाजिक जबाबदारी जपत एक महत्त्वाचा उपक्रम हाती घेतला आहे. अल्लू अर्जुन फॅन्स असोसिएशनकडून सात राज्यांमध्ये HPV लसीकरणाबाबत मोठ्या स्तरावर जनजागृती अभियान राबवण्यात येणार आहे.
प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, या अभियानाचा दुसरा टप्पा ८ आणि ९ सप्टेंबर रोजी पार पडणार आहे. सर्व्हायकल कॅन्सरपासून बचाव आणि HPV लसीकरणाचे महत्त्व याबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.
या अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात कार्यशाळा, शाळांमधील विशेष सत्रे आणि समुदाय पातळीवरील विविध जनजागृती उपक्रम आयोजित केले जाणार आहेत. सध्या ४०० कार्यक्रम घेण्याचे नियोजन करण्यात आले असून, संपूर्ण अभियानात १,००० हून अधिक तळागाळातील कार्यक्रम आयोजित करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
या उपक्रमाच्या माध्यमातून जवळपास १ लाख मुलींपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट आहे. कमी वयात HPV लसीकरणाचे महत्त्व तसेच सर्व्हायकल कॅन्सरपासून बचाव करण्यासाठी आवश्यक माहिती कुटुंबांपर्यंत पोहोचवण्यावर भर दिला जाणार आहे.
अल्लू अर्जुन यांच्या चाहत्यांनी यापूर्वीही विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग घेतला आहे. यावेळी HPV लसीकरणासारख्या महत्त्वाच्या विषयावर जनजागृती करण्यासाठी मोठ्या संख्येने चाहते पुढे येत आहेत. या माध्यमातून लसीकरणाबाबत योग्य माहिती पोहोचवण्यासोबतच सर्व्हायकल कॅन्सरपासून बचावाबाबत जागरूकता वाढवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
दरम्यान, अल्लू अर्जुनच्या आगामी प्रोजेक्ट्सचीही जोरदार चर्चा आहे. अॅटली यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होणाऱ्या ‘राका’ या चित्रपटाच्या घोषणेनंतर चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे. चित्रपटातील अल्लू अर्जुनचा नवा लूक समोर आल्यानंतर सोशल मीडियावरही त्याची मोठी चर्चा झाली.
याशिवाय लोकेश कनगराज यांच्यासोबतचा बहुप्रतीक्षित ‘AA23’ हा चित्रपटही त्यांच्या आगामी प्रोजेक्ट्समध्ये आहे. तसेच ‘पुष्पा ३: द रॅम्पेज’चीही चाहत्यांना उत्सुकता आहे. त्यामुळे सामाजिक कार्यासोबतच अल्लू अर्जुनच्या आगामी चित्रपटांवरही चाहत्यांचे लक्ष लागले आहे.