
(फोटो सौजन्य- सोशल मिडिया)
Clean Up Company Trailer: क्राईम, कॉमेडी आणि मैत्रीचा अनोखा मिलाफ असलेली नवी सीरिज ‘क्लीन अप कंपनी’ प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. Amazon Prime Videoने या आगामी MX ओरिजिनल सीरिजचा धमाकेदार ट्रेलर रिलीज केला आहे. अमेय वाघ, विशाल जेठवा, अजितेश गुप्ता, जिशू सेनगुप्ता, सस्वता चटर्जी आणि रवी किशन यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या सीरिजमध्ये एक अनोखी आणि थरारक कथा पाहायला मिळणार आहे.
‘क्लीन अप कंपनी’चे ८ भाग असून, ही सीरिज २१ ऑगस्ट २०२६ पासून प्राईम व्हिडिओ आणि नव्या नावाने लॉन्च झालेल्या MX प्लेयर बाय प्राईम व्हिडिओच्या अँड्रॉइड अॅपवर मोफत आणि एक्सक्लुझिव्ह स्ट्रीम होणार आहे.
एखाद्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचं कामच जर व्यवसायाची संधी बनलं, तर काय होईल? याच भन्नाट कल्पनेभोवती ‘क्लीन अप कंपनी’ची कथा फिरते.
या सीरिजमध्ये राजू, स्वपन आणि गोल्डी हे तीन मित्र आहेत. एका गँगस्टरसाठी मृतदेहांची विल्हेवाट लावण्याचं काम त्यांना मिळतं आणि इथून त्यांच्या आयुष्याला वेगळं वळण मिळतं. सुरुवातीला सहज मिळालेली संधी वाटणारा हा व्यवसाय हळूहळू त्यांना गुन्हेगारीच्या धोकादायक जगात घेऊन जातो.
स्वतःची सुरू करतात ‘क्लीन-अप कंपनी’
कायद्याची भीती नसलेल्या सरीबगंज शहराच्या पार्श्वभूमीवर या सीरिजची कथा घडते. गँगमधील संघर्ष, राजकीय प्रभाव आणि गुन्हेगारीचं जाळं यामुळे शहरातील परिस्थिती कायमच तणावपूर्ण असते.
अब्बासच्या माध्यमातून या तीन मित्रांना हत्येनंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचं काम मिळतं. त्यानंतर राजू, स्वपन आणि गोल्डी या संकटाचंच एका अनोख्या व्यवसायात रूपांतर करतात आणि स्वतःची ‘क्लीन-अप कंपनी’ सुरू करतात.
व्यवसाय वाढतो आणि संकटही!
मात्र त्यांचा व्यवसाय जसजसा वाढत जातो, तसतसे सरीबगंजमधील ताकदवान गँगस्टर्स त्यांच्या मागे लागतात. दुसरीकडे एका धाडसी महिला IPS अधिकाऱ्याचा तपासही शहरातील गुन्हेगारी नेटवर्कपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो.
त्यामुळे या तिघांसमोर संधी आणि धोका दोन्ही उभे राहतात. खून, फसवणूक आणि बदलती नाती यांच्या गुंत्यात ते अडकत जातात. सरीबगंज सोडून नव्याने आयुष्य सुरू करण्याचं त्यांचं स्वप्न प्रत्येक चुकीच्या निर्णयासोबत आणखी दूर जातं.
‘क्लीन अप कंपनी’मध्ये क्राईम थ्रिलरसोबत डार्क ह्यूमर आणि मैत्रीचा अनोखा मेळ पाहायला मिळणार आहे. जिओ स्टुडिओजची प्रस्तुती आणि GSEAMS प्रोडक्शनची ही सीरिज रोहन घोष यांनी लिहिली आणि दिग्दर्शित केली आहे. कोणार्क मुखर्जी हे सहलेखक आहेत.
प्राईम व्हिडिओ इंडियाच्या AVOD कंटेंटचे डायरेक्टर आणि हेड अमोघ दुसाद यांनी सांगितले की, ही कथा सुरुवातीपासून प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी असून क्राईम, गँगची लढाई, राजकारण, मैत्री आणि डार्क ह्यूमर यांचा अनोखा अनुभव देईल.
GSEAMS प्रोडक्शन्सचे निर्माते कार्तिक निशानदार आणि अर्जुन सिंघ बरन यांनीही या सीरिजबद्दल उत्सुकता व्यक्त केली. तीन तरुण आपल्या अस्तित्वासाठी आणि स्वप्नांसाठी संघर्ष करताना कोणत्या परिस्थितीत अडकतात, हे या कथेतून दाखवण्यात आलं आहे.
‘क्लीन अप कंपनी’ २१ ऑगस्ट २०२६ पासून प्राईम व्हिडिओ आणि MX प्लेयर बाय प्राईम व्हिडिओच्या अँड्रॉइड अॅपवर मोफत उपलब्ध होणार आहे. मोबाईल डिव्हाइसेस, कनेक्टेड टीव्ही, अॅमेझॉन शॉपिंग अॅप, प्राईम व्हिडिओ आणि फायर टीव्हीवरही ही सेवा उपलब्ध आहे.