
( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)
Gaurav Khanna-Akanksha Chamola Divorce: गौरव खन्ना आणि आकांक्षा चमोला यांच्या वैवाहिक नात्याबाबत गेल्या काही काळापासून चर्चा सुरू आहे. दोघे विभक्त राहत असल्याची माहिती समोर आल्यानंतर त्यांच्या घटस्फोटाच्या बातम्यांनीही जोर धरला. त्यातच आकांक्षाने गौरवकडून तब्बल १० कोटी रुपये पोटगी म्हणून मागितल्याची अफवा सोशल मीडियावर पसरली होती. आता आकांक्षाने स्वतः या चर्चांवर स्पष्टीकरण देत हे दावे फेटाळून लावले आहेत.
‘लॉक अप २’मध्ये दिसणाऱ्या आकांक्षा चमोला हिने नुकतीच मॅशेबल इंडियाला मुलाखत दिली. यावेळी तिला १० कोटी रुपयांची पोटगी मागितल्याच्या चर्चेबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर आकांक्षाने मिश्कील अंदाजात उत्तर देत म्हटलं, “जर मी ते मागितले असते आणि मला ते मिळाले असते, तर मी आज इथे बसले असते.”
आकांक्षाने पुढे या अफवांवर भाष्य करताना म्हटलं, “जर माझ्याकडे खरंच एवढे पैसे असते, तर मी केव्हाच हा देश सोडून गेले असते.” अशा शब्दांत तिने १० कोटी रुपयांच्या पोटगीची मागणी केल्याची चर्चा फेटाळून लावली. तिच्या या प्रतिक्रियेची सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे.
दरम्यान, आकांक्षाने तिच्या आणि गौरवच्या वयातील अंतरावरून ट्रोल करणाऱ्यांनाही सडेतोड उत्तर दिलं. काही सोशल मीडिया युजर्सनी गौरव तिच्यापेक्षा १० वर्षांनी मोठा असल्याने आकांक्षाला ‘शुगर डॅडीच्या शोधात’ असल्याचं म्हटलं होतं.
या ट्रोलिंगवर प्रतिक्रिया देताना आकांक्षाने म्हटलं की, ३०, ४० किंवा ५० वर्षांच्या पुरुषांना ‘शुगर डॅडी’ म्हटलं जातं. गौरवचा संदर्भ देत ती म्हणाली, “१० वर्षांनी मोठा पुरुष ‘शुगर डॅडी’ असू शकत नाही.”
आकांक्षाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटशी संबंधित चर्चांवरही स्पष्टीकरण दिलं. तिच्या Instagram युझरनेममध्ये अजूनही ‘आकांक्षा गौरव खन्ना’ हे नाव असल्याने युजर्समध्ये प्रश्न उपस्थित होत होते. यावर बोलताना तिने सांगितलं की, मेटाशी संबंधित एका समस्येमुळे ती युझरनेम बदलू शकत नाही.
“मेटाचे लोक ते बदलत नाहीत,” असं आकांक्षाने सांगितलं.
आकांक्षा चमोला आणि गौरव खन्ना यांनी २४ नोव्हेंबर २०१६ रोजी कानपूरमध्ये तीन दिवसांच्या सोहळ्यात लग्न केलं होतं. ‘लॉक्ड अप: ट्रुथ ऑर डेअर’च्या प्रीमियरदरम्यान आकांक्षाने त्यांच्या विभक्त होण्याची सार्वजनिकरित्या घोषणा केली होती. दोघे जवळपास एक वर्षापासून वेगळे राहत असल्याचं तिने सांगितलं होतं. तसेच, हा निर्णय परस्पर संमतीने घेतला असून त्यांच्यात कोणतीही कटुता नसल्याचंही तिने स्पष्ट केलं होतं.