( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)
Marathi Serial: झी मराठीवरील ‘सावळ्याची जणू सावली’ ही मालिका सध्या प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. मालिकेत सतत होणारे वाद, भांडणं आणि कटकारस्थानांमुळे कथानकाला वेगळं वळण मिळताना दिसत आहे. सावलीला मेहेंदळे कुटुंबापासून दूर करण्यासाठी तिलोत्तमा, भैरवी आणि राजकुमार सातत्याने प्रयत्न करताना दिसतात. राजकुमारची दुसरी पत्नी मोनिकादेखील त्यांना साथ देत असून, ती सारंगची मुलगी ओवीलाही त्रास देताना पाहायला मिळाली आहे.
मात्र, आता मालिकेच्या कथानकात मोठा बदल होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. झी मराठीने सोशल मीडियावर मालिकेचा आगामी भागाचा प्रोमो शेअर केला आहे. हा प्रोमो सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत असून, गणरायाच्या आगमनामुळे मेहेंदळे कुटुंबातील वातावरण बदलताना दिसत आहे.
प्रोमोमध्ये ओवी आणि अबीर खेळताना दिसतात. त्याचवेळी मोनिका तिथे येते आणि ओवीचा चुकून तिला धक्का लागतो. त्यामुळे घाबरलेली ओवी मोनिकाची माफी मागत, “सॉरी काकू,” असं म्हणते. सुरुवातीला मोनिका ओवीवर हात उचलताना दिसते. मात्र, पुढच्याच क्षणी तिच्या वागण्यात अनपेक्षित बदल होतो.
मोनिका हसत ओवीला म्हणते, “सॉरी नको. काकूला ओवीचा पापा हवाय.” मोनिकाचं हे बदललेलं रूप पाहून ओवीला आश्चर्याचा धक्का बसतो. तर तिथेच असलेला अबीर म्हणतो, “बाप्पा घरी आल्यानंतर मोनिका काकू सुधारल्या आहेत.”
मोनिकामध्ये झालेला हा बदल पाहून सावलीच्या डोळ्यांत आनंदाश्रू येतात. सावलीला भावूक झालेलं पाहून तिथे आलेली तिलोत्तमा तिचे अश्रू पुसते. त्यानंतर ती सावलीला म्हणते, “आता अश्रू पुसायचे आणि पुढचे १० दिवस सगळ्यांना प्रेमानं जपायचं.” एवढंच नाही तर तिलोत्तमा सावलीला प्रेमाने मिठी मारते.
तिलोत्तमाचं हे रूप पाहून सावलीदेखील भावूक झाल्याचं प्रोमोमध्ये दिसत आहे. आतापर्यंत सावलीला त्रास देणारी तिलोत्तमा अचानक तिच्याशी प्रेमाने वागताना दिसल्यामुळे मालिकेत नेमका कोणता बदल होणार, याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.
View this post on Instagram
Aishwarya Narkar: “तुम्ही स्वतःच 80s च्या आहात, ओरिजनल फोटो टाका…”; ऐश्वर्या नारकरांचं भन्नाट उत्तर
श्री गणेशाच्या आगमनामुळे मेहेंदळे कुटुंबात आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. कुटुंबातील सदस्यांच्या चेहऱ्यावरही आनंद पाहायला मिळत आहे. झी मराठीने हा प्रोमो शेअर करताना, “गणरायाच्या आगमनाने मेहेंदळे घरात आनंद फुलणार,” असं कॅप्शन दिलं आहे.
या प्रोमोवर नेटकऱ्यांनीही कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. तिलोत्तमामध्ये झालेला हा अचानक बदल कायम राहणार का? मोनिका खरंच सुधारली आहे की यामागे आणखी काही कटकारस्थान आहे? पुढील दहा दिवसांत सावलीच्या आयुष्यात काय घडणार? याची उत्सुकता आता प्रेक्षकांना लागली आहे.






