(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Govinda: बॉलिवूड अभिनेता गोविंदा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी गोविंदा आणि अभिनेत्री कोमल राणी स्वर्णकर यांच्या कथित अफेअरच्या बातम्यांनी जोर धरला होता. आता पुन्हा एकदा हे दोघे एकत्र दिसल्याने त्यांच्या नात्याबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे. मंगळवारी संध्याकाळी गोविंदा मुंबईतील लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पोहोचला. यावेळी त्याच्यासोबत कोमल राणीही दिसली.
लालबागच्या राजाच्या मंडपात गोविंदा आणि कोमल राणी यांनी बाप्पाचं दर्शन घेतलं. दोघांनी प्रसाद अर्पण केला आणि पूजेतही सहभाग घेतला. यावेळी पुजाऱ्यांनी त्यांच्या कपाळावर टिळा लावला. दर्शन घेतल्यानंतर गोविंदा बाहेर आला आणि तिथे उपस्थित असलेल्या चाहत्यांना हात दाखवत त्यांच्याशी संवाद साधला. तो यावेळी आनंदी आणि हसतमुख दिसत होता.
गोविंदा आणि कोमल राणी एकत्र दर्शन घेत असल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर त्यांच्या कथित जवळीकीबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.
ऑगस्ट महिन्यात गोविंदा आणि कोमल राणी विमानतळावर एकत्र दिसले होते. त्यानंतर दोघांच्या नात्याबाबतच्या चर्चांना अधिकच जोर आला. याचदरम्यान गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा यांनी पापाराझींशी बोलताना गोविंदा आणि कोमल राणी यांच्या कथित अफेअरबाबत वक्तव्य केल्याचं समोर आलं होतं.
सुनीता यांनी गोविंदासोबत कोमल राणीच्या जवळिकीवर नाराजी व्यक्त केली होती. तसेच आपल्या मुलीच्या वयाच्या मुलीसोबत फिरण्यावरून त्यांनी गोविंदाला टोमणाही मारला होता. या सगळ्या चर्चांनंतर दोघांच्या वैवाहिक नात्याबाबतही प्रश्न उपस्थित झाले होते. मात्र, नंतर सुनीता आहुजा यांनी घटस्फोटाची याचिका मागे घेतल्याचं सांगितलं गेलं.
गोविंदाच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
गोविंदा आणि कोमल राणीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही युजर्सनी गोविंदावर टीका केली, तर काहींनी सुनीता आहुजांना पाठिंबा दिला.
एका युजरने कमेंट करत लिहिलं, “जे आपल्या पत्नीला त्रास देतात, त्यांची प्रार्थना देवसुद्धा ऐकत नाही.” तर दुसऱ्या युजरने सुनीता आहुजांना उद्देशून, “सुनीताजी, आम्ही तुमच्यासोबत आहोत,” अशी कमेंट केली.
एका युजरने थेट प्रश्न विचारला, “त्याने या बाईशी लग्न केलं आहे का?” तर आणखी एका कमेंटमध्ये लिहिलं होतं, “सुनीता मॅडम कुठे आहेत? तुम्ही त्याच्यासोबत दर्शनासाठी यायला हवं होतं; तुम्ही अजूनही त्याच्याशी विवाहित आहात.”
गोविंदा आणि कोमल राणी यांच्यात नेमकं काय नातं आहे, याबाबत दोघांकडून अधिकृत स्पष्टीकरण समोर आलेलं नाही. मात्र, लालबागच्या राजाच्या दर्शनाचा त्यांचा व्हिडीओ समोर आल्यानंतर या चर्चांना पुन्हा एकदा हवा मिळाली आहे.






