
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)
Janhvi Kapoor: बॉलिवूडमध्ये सध्या हॅलोविन सेलिब्रेशनचा उत्साह पाहायला मिळत आहे. अनेक सेलिब्रिटी वेगवेगळे आणि हटके लूक करून हॅलोविन साजरा करत आहेत. मात्र, यंदा अभिनेत्री जान्हवी कपूरच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. जान्हवीने आई श्रीदेवी यांच्या १९८६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘नगीना’ चित्रपटातील आयकॉनिक नागिन लूक साकारला आहे. तर तिची बहीण खुशी कपूर सुपरवुमनच्या अवतारात दिसली. विशेष म्हणजे, या खास लूकमध्ये ओरीनेही जान्हवीला साथ दिली.
जान्हवी कपूरने यंदाचा हॅलोविन अतिशय खास पद्धतीने साजरा केला. तिने आई श्रीदेवी यांच्या गाजलेल्या ‘नगीना’ चित्रपटातील नागिनच्या रूपाची आठवण करून दिली. सापाचा पोशाख परिधान करून जान्हवीने श्रीदेवींच्या आयकॉनिक लूकला अनोखी आदरांजली वाहिली. तिच्यासोबत ओरीदेखील दिसला. त्याने दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांची भूमिका साकारली होती.
हे फोटो शेअर करत जान्हवीने लिहिले, “हॅपी हॅलोविन! मला आतापर्यंतच्या सर्वात अविस्मरणीय चित्रपट क्षणांपैकी एका क्षणाला पुन्हा जिवंत करावेसे वाटले.”
तिने पुढे सांगितले की, हॅलोविन म्हणजे केवळ भीतीदायक पोशाख परिधान करणे नाही. आपल्या आवडत्या व्यक्तिरेखा आणि पॉप कल्चरमधील अविस्मरणीय प्रसंग साकारण्याचीही ही एक संधी आहे. कधी हे लूक मजेशीर असतात, तर कधी एखाद्या व्यक्तीच्या आठवणी जपण्याचा सुंदर मार्ग ठरतात. आई श्रीदेवी, ऋषी कपूर आणि अमरीश पुरी यांच्यापेक्षा अधिक अविस्मरणीय कोण असू शकते, असा भावनिक उल्लेखही तिने केला.
खुशी कपूर बनली सुपरवुमन
जान्हवीप्रमाणेच तिची बहीण खुशी कपूरनेही हॅलोविनसाठी खास तयारी केली होती. खुशीने सुपरवुमनचा अवतार धारण केला होता. तिचा हा हटके लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. दोन्ही बहिणींचे हॅलोविन सेलिब्रेशनमधील फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत.
जान्हवीने निवडलेल्या या लूकमुळे श्रीदेवी यांच्या ‘नगीना’ चित्रपटाच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या आहेत. १९८६ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात श्रीदेवी यांनी इच्छाधारी नागिणीची भूमिका साकारली होती. सूडाची कथा असलेल्या या चित्रपटातील त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली होती.
‘नगीना’ हा त्या वर्षातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक ठरला होता. या चित्रपटाच्या प्रचंड यशामुळे श्रीदेवी यांच्या कारकिर्दीला मोठी कलाटणी मिळाली. त्यानंतर त्या हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या महिला सुपरस्टार म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. त्यामुळे जान्हवीने हॅलोविनच्या निमित्ताने साकारलेला हा लूक केवळ एक वेशभूषा नसून आईच्या आठवणींना दिलेली खास आदरांजली ठरली आहे.