
फोटो सौजन्य - Social Media
‘मामाच्या गोव्याला जाऊया’ या आगामी मराठी चित्रपटाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित झाला असून, त्यात कॉमेडी, अॅक्शन, सस्पेन्स आणि अनपेक्षित ट्विस्ट्सचा जबरदस्त संगम पाहायला मिळत आहे. याआधी प्रदर्शित झालेल्या टीझरमध्ये संत्या, बाबा, कुश्या आणि त्यांचा लाडका मामा यांची गोव्याच्या ट्रिपवरील धमाल पाहायला मिळाली होती. मात्र, ट्रेलरमध्ये या प्रवासाला रहस्य आणि थराराची नवी किनार मिळाल्याने प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे. ट्रेलरच्या अखेरीस अंकुश चौधरी यांचा डॉन अवतार पाहून चित्रपटात नेमकं काय घडणार, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.
ट्रेलरची सुरुवात गोव्यातील मजेशीर सहलीपासून होते. संत्या, बाबा, कुश्या आणि मामामधील भन्नाट केमिस्ट्री, त्यांच्यावर ओढवणारे विनोदी प्रसंग आणि सतत निर्माण होणारा गोंधळ प्रेक्षकांना खळखळून हसवतो. मात्र, कथेला अचानक वेगळं वळण मिळतं आणि साधा, निरागस वाटणारा मामा एका क्षणात डॉनच्या अवतारात समोर येतो. यानंतर सुरू होतो अॅक्शन, पाठलाग आणि एकामागून एक धक्कादायक ट्विस्ट्सचा खेळ.
मामा नेमका कोण आहे? तो खरोखरच डॉन आहे की त्यामागे आणखी काही मोठं रहस्य दडलं आहे? या प्रश्नांची उत्तरं चित्रपटगृहातच मिळणार आहेत. गोव्याच्या नयनरम्य पार्श्वभूमीवर मैत्री, विनोद, थरार आणि अॅक्शनचा अफलातून मेळ ट्रेलरमध्ये पाहायला मिळतो. त्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांसाठी एक संपूर्ण मनोरंजनाचा पॅकेज ठरण्याची चिन्हे आहेत.
चित्रपटात अंकुश चौधरी, कुशल बद्रिके, अभिजित चव्हाण आणि संतोष जुवेकर यांची भन्नाट केमिस्ट्री विशेष लक्ष वेधून घेते. त्यांच्यासोबत महेश मांजरेकर, संजय जाधव, सचिन गोस्वामी, मकरंद अनासपुरे, मकरंद देशपांडे, अवधूत गुप्ते आणि प्रवीण तरडे यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. तसेच नेहा खान, रुचिरा जाधव आणि विदुला चौगुले यांचाही ग्लॅमरस अंदाज ट्रेलरमध्ये पाहायला मिळतो.
दिग्दर्शक विजू माने यांनी सांगितले की, ‘स्ट्रगलर साला’मधील संत्या, बाबा आणि कुश्या या पात्रांवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले. यावेळी त्यांच्या आयुष्यात ‘मामा’ येतो आणि त्यांचा प्रवास पूर्णपणे बदलून जातो. प्रत्येक पात्राची स्वतःची वेगळी मजा असून, प्रत्येक प्रसंग प्रेक्षकांना हसवतानाच पुढे काय होणार याची उत्सुकताही कायम ठेवेल. विजुमेनिया प्रा. लि. आणि लाईट अँड शेड प्रस्तुत हा चित्रपट ३१ जुलै रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असून, रहस्य, मैत्री, कॉमेडी आणि अॅक्शनचा फुल ऑन डोस घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.