
फोटो सौजन्य - Social Media
रेडबेल मीडिया आणि पॅनोरमा स्टुडिओज प्रस्तुत आगामी मराठी चित्रपट ‘स्वप्नसुंदरी’ सध्या आपल्या वेगळ्या कथानकासह सुरेल संगीतामुळेही चर्चेचा विषय ठरत आहे. चित्रपटातील ‘फुलतो जसा मोगरा’ हे नवं रोमँटिक गाणं नुकतंच प्रदर्शित झालं असून, त्यातील हळुवार सूर आणि भावस्पर्शी दृश्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या गीतातून भूषण प्रधान आणि सायली पाटील यांच्यातील निरागस, गोड आणि हळवी प्रेमकहाणी प्रभावीपणे साकारण्यात आली आहे.
या गीताला गायक अभय जोधपूरकर आणि ऋषिका मुखर्जी यांच्या मधुर आवाजाची साथ लाभली आहे. गीतकार श्रीरंग गोडबोले यांनी प्रेमभावना शब्दांत गुंफल्या असून, संगीतकार अंकुश बोराडकर यांनी त्याला सुरेल चालीची जोड दिली आहे. यापूर्वी प्रदर्शित झालेल्या गाण्यांनाही प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला होता. आता ‘फुलतो जसा मोगरा’ या गीतामुळे चित्रपटाविषयीची उत्सुकता आणखी वाढली आहे.
या गाण्याविषयी बोलताना दिग्दर्शक अक्षय जयसिंगराव शिंदे म्हणाले, “‘स्वप्नसुंदरी’ ही दोन मनांच्या भावविश्वाचा प्रवास मांडणारी कथा आहे. योग्य जोडीदाराच्या शोधापासून सुरू झालेला हा प्रवास प्रेम, विश्वास, सहजीवन आणि वैवाहिक आयुष्यातील सुंदर क्षणांपर्यंत पोहोचतो. ‘फुलतो जसा मोगरा’ हे गाणं या प्रवासातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. दोन व्यक्तींमधील न बोलता व्यक्त होणाऱ्या भावना, एकमेकांवरील विश्वास आणि सहवासातील आनंद या गीतातून प्रभावीपणे उलगडतो. प्रत्येकाच्या आयुष्यात काही क्षण असे असतात, जे शब्दांपेक्षा भावनांतून अधिक व्यक्त होतात. हे गाणं प्रेक्षकांना त्यांच्या अशाच एखाद्या सुंदर आठवणीशी जोडून ठेवेल, असा मला विश्वास आहे.”
‘स्वप्नसुंदरी’ हा चित्रपट प्रेमकथा, कौटुंबिक नाती, लग्नसंस्था आणि योग्य जीवनसाथीच्या शोधाला स्पर्श करणारा मनोरंजनपट आहे. या चित्रपटाची निर्मिती सतीश महादेव गेजगे यांनी केली असून, दर्शना सतीश गेजगे आणि निलेश सुरेश अग्रवाल हे सहनिर्माते आहेत. चित्रपटाची कथा, पटकथा आणि दिग्दर्शनाची जबाबदारी अक्षय जयसिंगराव शिंदे यांनी सांभाळली आहे.
रोमँटिक कथानक, सुरेल संगीत आणि दमदार कलाकारांच्या अभिनयामुळे **‘स्वप्नसुंदरी’**बद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली असून, हा चित्रपट २४ जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.