
फोटो सौजन्य - Social Media
मुंबई महापालिकेच्या बृहन्मुंबई क्रीडा आणि ललितकला प्रतिष्ठानच्या व्यवस्थापकीय विश्वस्तपदी ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांची निवड करण्यात आली आहे. शुक्रवारी (१० जुलै) मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी त्यांना नियुक्तीपत्र सुपूर्द केले. या नियुक्तीनंतर महापालिकेच्या कला आणि क्रीडा क्षेत्रातील विविध उपक्रमांच्या नियोजनात व विकासकामांमध्ये दामले यांचा सक्रिय सहभाग राहणार आहे.
प्रशांत दामले यांच्या नावाची शिफारस प्रतिष्ठानच्या विश्वस्त मंडळाने एकमताने मंजूर केली. रंगभूमी आणि सांस्कृतिक क्षेत्रातील त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा लाभ प्रतिष्ठानला मिळेल, असा विश्वास महापौरांसह अन्य पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
मराठी रंगभूमीवर वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या दामले यांनी ३६ नाटकांमधून १३,५३८ पेक्षा अधिक प्रयोग सादर करत जागतिक विक्रम केला आहे. त्यांच्या या विक्रमाची लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये चार वेळा नोंद झाली आहे. तसेच, संगीत नाटक अकादमी पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात आला असून, सध्या ते अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष म्हणूनही कार्यरत आहेत.