
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)
Aai Tuljabhavani Serial: गणेशोत्सवाला आता काहीच दिवस बाकी असून सर्वत्र उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. याच उत्साहात भर घालण्यासाठी कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘आई तुळजाभवानी’च्या आगामी भागांमध्ये प्रेक्षकांना एक खास दैवी अनुभव पाहायला मिळणार आहे. गणेश चतुर्थीच्या निमित्ताने मालिकेत साक्षात बालगणेशाचं आगमन होणार असून, त्यांच्या खट्याळ लीला आणि गोड रूपामुळे तुळजापुरातील वातावरण चैतन्यमय होणार आहे.
सध्या मालिकेच्या कथानकात चातुर्मासाच्या पोथीभोवती मोठा पेच निर्माण झाला आहे. देवीच्या महालातून अचानक चातुर्मासाची दिव्य पोथी आणि स्वयंपाकघरातील नैवेद्य गायब झाल्याने देवीसह सर्वांची चिंता वाढली आहे.
याच दरम्यान देवीच्या महालात एका खट्याळ बालरूपाचं आगमन होतं. लहान-लहान पावलांनी वाड्यात फिरणारं आणि खट्याळपणे हसणारं हे बालरूप दुसरं-तिसरं कोणी नसून साक्षात बालगणेश आहेत. विशेष म्हणजे, हरवलेली चातुर्मासाची पोथी त्यांच्याच हातात असते.
बालगणेश अत्यंत गोड शब्दांत, “पुढचे अकरा दिवस या पोथीची जबाबदारी माझी!” असं सांगत देवीच्या महालात प्रवेश करतात.
गणेश चतुर्थीच्या काळातच बालगणेशाचं आगमन होत असल्याने महालात त्यांचं वाजत-गाजत आणि भक्तिभावाने स्वागत केलं जातं. बालगणेशाचं हे गोड रूप पाहून देवी पार्वतीच्या रूपातील तुळजाभवानीही भारावून जाते.
सध्या असुरांनी मिळवलेलं ब्रह्मास्त्र निष्प्रभ करण्यासाठी तुळजाभवानीने बालरूप धारण केलं आहे. त्यामुळे बालगणेश आणि देवीचं हे बालरूप एकत्र आल्याने मालिकेत पुढील भागांमध्ये अनेक रंजक प्रसंग पाहायला मिळणार आहेत.
Mirzapur Box Office Collection: ‘कालीन भैय्या’चा दबदबा कायम! 10 सप्टेंबरला सिनेमाने केली तुफान कमाई
पुढील अकरा दिवस बालगणेशाच्या आगमनामुळे महालातील वातावरण पूर्णपणे बदलून जाणार आहे. त्यांच्या खट्याळ लीला, गोड बोलणं आणि खेळकरपणामुळे कथेला एक वेगळाच रंग मिळणार आहे.
त्यातच देवीच्या बालरूपामुळे तयार झालेली बालगोपाळांची टोळीही बालगणेशाच्या या लीलांमध्ये सहभागी होणार आहे. त्यामुळे आगामी भागांमध्ये भक्ती, उत्साह आणि खट्याळपणाचा सुंदर मिलाफ पाहायला मिळणार आहे.
बालगणेशाच्या आगमनासोबतच मालिकेत चातुर्मासाच्या कथा आणि भक्तीचे नवे पैलूही उलगडणार आहेत. बालगणेशाचं गोड रूप, त्यांच्या खट्याळ लीला आणि त्यानंतर घडणाऱ्या रंजक घडामोडी प्रेक्षकांसाठी खास पर्वणी ठरणार आहेत.