
सांगलीचे मूर्तिकार नरेंद्र दामले
नरेंद्र दामले सांगतात, “लॉकडाऊनमध्ये दुकान बंद राहिले. उत्पन्न थांबले. अनेक गोष्टींचे नुकसान झाले. पुस्तकांचीही रद्दी झाली. त्यावेळी काहीतरी करायला पाहिजे, असा विचार मनात होता. आमच्या शेजारी राहणाऱ्या एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील मुलीला शाळेसाठी गणपती बनवायचा होता. तिने मला विचारले, ‘काका, तुम्हाला येते का? मला काही येत नाहीये.
मी यापूर्वी गणपतीची मूर्ती कधी केली नव्हती. लहानपणी नागोबा आणि बैल बनवले होते. किल्लेही करत असे; पण गणपतीची मूर्ती करण्याचा अनुभव नव्हता. तरी तिच्यासाठी प्रयत्न केला. मी चित्रकला आणि स्केचिंग करत असल्याने शरीराचे प्रमाण, डोके, हात यांचा अंदाज मनात होता. त्या आधारावर पहिली मूर्ती तयार केली आणि ती खूपच चांगली झाली,” असे ते सांगतात. हीच पहिली मूर्ती त्यांच्या कलाप्रवासाची सुरुवात ठरली.
Ganesh Chaturthi: दीड ते दहा दिवसांचा गणपती; प्रत्येक दिवसामागे काय आहे महत्त्व? जाणून घ्या
पहिली मूर्ती पाहून सर्वांनाच ती आवडली. त्यामुळे पुढील गणेशोत्सवात घरच्या घरी तयार केलेली मूर्तीच बसविण्याचा निर्णय झाला. त्यानंतर मात्र मूर्ती बनविण्याची संख्या दरवर्षी वाढत गेली. पहिल्या वर्षी एक मूर्ती, दुसऱ्या वर्षी ३२, त्यानंतर ४५, पुढे ७२ आणि यंदा तब्बल ९६ गणपतींची निर्मिती त्यांनी केली आहे. विशेष म्हणजे हे सर्व काम ते स्वतः करतात. रंगकाम आणि अन्य कामांमध्ये कुटुंबीय मदत करतात.
पहिल्या वर्षी एकच मूर्ती केली. लोकांना ती आवडली. मग पुढच्या वर्षी हात मातीत थोडा बसला आणि संख्या वाढत गेली. ३२, ४५, ७२ करत यंदा ९६ मूर्ती तयार केल्या आहेत,” असे दामले सांगतात.
गणपतीचे काम केवळ गणेशोत्सवाच्या काही दिवसांपुरते मर्यादित नसते. दामले दसऱ्याच्या मुहूर्तावर पुढील वर्षाच्या गणपतीच्या कामाला सुरुवात करतात. गणपती उत्सव झाला की साधारण महिन्याभराने दसरा येतो. त्या दसऱ्याला पुढील वर्षाच्या गणपतीसाठी मुहूर्त करतो. त्यामुळे जवळपास ११ महिने गणपतीचा कारखाना सुरूच असतो,” ते सांगतात.
हाताने मूर्ती बनविण्याबरोबरच दामले यांनी स्वतःच्या मूर्तीचे साचेही तयार केले आहेत. बाजारातून एक फुटी गणपतीचा साचा घेतल्यास सुमारे ४५०० रुपये खर्च येतो. मात्र केवळ साचा असल्याने मूर्ती पूर्ण होत नाही, असे ते स्पष्ट करतात. साच्यातून फक्त मूर्तीची बॉडी निघते. त्यानंतर हात, सोंड, किरीट आणि इतर बारकावे कलाकारालाच करावे लागतात. त्यामुळे साचा असला तरी हाताची कला दाखवावीच लागते,” असे ते सांगतात.
गणपती मूर्ती बनविण्याकडे ते केवळ व्यवसाय म्हणून पाहत नाहीत. “कला म्हणून ही गोष्ट जोपासायची, गणपतीची सेवा करायची आणि आपण केलेल्या कामाचे मानधन घ्यायचे,” अशी त्यांची भूमिका आहे.
मूर्ती बनविण्याच्या व्यवसायावर संपूर्ण कुटुंबाची उपजीविका अवलंबून ठेवणे मात्र सोपे नसल्याचे ते सांगतात. “पूर्ण कुटुंबाची उपजीविका यावर करायची असेल, तर कुटुंबातील सगळ्यांना हे काम यायला पाहिजे आणि मूर्तींची संख्या वाढली पाहिजे. केवळ गणपती बनवून पूर्ण घर चालेल, अशी कल्पना करणे योग्य नाही,” असे ते स्पष्ट करतात. यापूर्वी दुकान सांभाळत त्यांनी मूर्ती बनविण्याचे काम केले. मात्र आता त्यांनी दुकान पूर्णपणे बंद करून पुढील वर्षापासून मूर्तीनिर्मितीलाच पूर्णवेळ देण्याचा निर्णय घेतला आहे.
लहानपणी मातीशी असलेले नाते आणि चित्रकलेची आवड यामुळे गणपतीच्या मूर्तीकलेला आकार देता आला. मात्र प्रत्यक्ष गणपती घडविण्याला सुरुवात झाली ती लॉकडाऊनमध्ये. जवळपास ४५-४६ वर्षांनंतर मी पुन्हा मातीत हात घातला. त्याआधी मुलांसाठी किल्ले वगैरे करत होतो; पण गणपतीची मूर्ती कधी केली नव्हती. लॉकडाऊनमधला एक छोटासा प्रयत्न आज इथपर्यंत घेऊन आला,” असे नरेंद्र दामले सांगतात.
एका अडचणीच्या काळात केलेला छोटासा प्रयत्न आज त्यांच्या आयुष्याची कलासाधना बनला आहे. एका शाळकरी मुलीच्या गणपतीपासून सुरू झालेला हा प्रवास आता ९६ गणरायांच्या रूपाने उभा आहे.