
फोटो सौजन्य - Social Media
पूजा सावंत पुन्हा एकदा वेगळ्या आणि दमदार भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येत असून, आगामी सालबर्डी या चित्रपटात ती करारी पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत झळकणार आहे. मराठी चित्रपटसृष्टीत आघाडीच्या नायिकेला पोलिसांच्या वर्दीत पाहणं तसं दुर्मिळ मानलं जातं, मात्र या चित्रपटातून ती चौकट मोडत पूजा एक निर्भीड, तडफदार आणि धाडसी अधिकारी म्हणून समोर येत आहे. तिच्या व्यक्तिरेखेचं नाव पी.आय. मनोरमा प्रधान असं असून, नुकताच चित्रपटाचा दमदार टीझर आणि कलाकारांचे प्रभावी पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहेत.
या लाँच सोहळ्यात पूजाने डॅशिंग एंट्री घेत आपल्या भूमिकेची झलक दाखवली. या व्यक्तिरेखेसाठी तिने विशेष मेहनत घेतली असून, पोलिसांची देहबोली, अधिकारपूर्ण संवादशैली आणि शिस्तबद्ध वर्तन यांचा सखोल अभ्यास केला आहे. भूमिका अधिक वास्तवदर्शी वाटावी यासाठी तिने प्रत्यक्ष पोलिस अधिकाऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या कामकाजाचं बारकाईने निरीक्षण केलं.
आपल्या भूमिकेबद्दल बोलताना पूजा म्हणाली, “वर्दी अंगावर चढताच एक वेगळाच रुबाब आपोआप येतो. तो वेगळा दाखवावा लागत नाही. वर्दीतच एक ताकद असते.” तिच्या मते, ही भूमिका प्रत्येक स्त्रीला प्रेरणा देणारी ठरेल. चित्रपटातील थरारक स्टंट्स आणि दमदार अॅक्शन सीन्स हे ‘सालबर्डी’चं खास आकर्षण असणार आहेत, ज्यामुळे प्रेक्षकांना एक वेगळाच सिनेमॅटिक अनुभव मिळणार आहे.
हा चित्रपट महाराष्ट्रातील दुर्गम भागात वसलेल्या ‘सालबर्डी’ गावात घडणाऱ्या रहस्यमय, भयावह आणि अस्वस्थ करणाऱ्या घटनांवर आधारित आहे. नेब्यूला फिल्म्सच्या बॅनरखाली साकारलेल्या या चित्रपटाची निर्मिती अनिल देवडे पाटील, डॉ. गजानन जाधव आणि राम जाधव यांनी केली आहे, तर दिग्दर्शनाची जबाबदारी रमेश साहेबराव चौधरी यांनी सांभाळली आहे.
चित्रपटाचे छायांकन व संकलन सिद्धेश संतोष मोरे यांचे आहे. पटकथा व संवाद रोहित शुक्रे यांनी लिहिले असून, गुरु ठाकूर आणि मुकुंद भालेराव यांच्या गीतांना पद्मनाभ गायकवाड यांचे संगीत लाभले आहे. पार्श्वसंगीत अमर मोहिले यांनी दिले असून, अजय गोगावले, जावेद अली आणि आनंदी जोशी यांच्या आवाजाने गाणी सजली आहेत. नृत्यदिग्दर्शन फुलवा खामकर आणि आशीष पाटील यांनी केले आहे. ‘सालबर्डी’ हा चित्रपट येत्या १७ एप्रिल रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार असून, पूजाच्या या दमदार अवतारामुळे प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबद्दलची उत्सुकता अधिकच वाढली आहे.