
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)
Ramayana Box Office Collection: बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा बहुचर्चित ‘रामायण’ चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर जोरदार कामगिरी करताना दिसत आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षकांकडून त्याला चांगला प्रतिसाद मिळत असून, कमाईचे नवनवे विक्रमही रचले जात आहेत. आता या चित्रपटाने जगभरातील कमाईचा १,२०० कोटींचा टप्पा पार केला आहे. विशेष म्हणजे, दहाव्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत मोठी वाढ झाली असून, त्याने ‘ॲनिमल’चा विक्रमही मागे टाकल्याची माहिती समोर आली आहे.
‘रामायण’च्या भारतीय बॉक्स ऑफिसवरील कमाईत मोठी वाढ पाहायला मिळाली आहे. चित्रपटाने एका दिवसात भारतीय बाजारपेठेत तब्बल ७२.९० कोटी रुपयांची निव्वळ कमाई केली आहे. गेल्या शुक्रवारच्या तुलनेत या कमाईत ५१.६ टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यामुळे चित्रपटाला मिळणारा प्रेक्षकांचा प्रतिसाद किती मोठा आहे, याचा अंदाज येतो.
Daryabhavani Movie Shooting: कोकणातील ‘या’ किल्ल्यावर सुरू आहे ऐतिहासिक शूटिंग; साकारणार शिवरायांच्या आरमाराची गोष्ट
भारतात ८१९ कोटींचा टप्पा पार
भारतीय बॉक्स ऑफिसवरही ‘रामायण’ची घोडदौड सुरूच आहे. चित्रपटाचे एकूण देशांतर्गत निव्वळ कलेक्शन ६८५.६० कोटी रुपयांवर पोहोचले आहे. तर भारतातील एकूण ग्रॉस कलेक्शनने ८१९.५० कोटी रुपयांचा टप्पा गाठला आहे. त्यामुळे रणबीर कपूरच्या या चित्रपटाने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवरही मोठी कमाई केली आहे.
भारतातच नव्हे, तर परदेशातही ‘रामायण’ला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. दहाव्या दिवशी चित्रपटाने जगभरात ३० कोटी रुपयांची कमाई केली. यामुळे चित्रपटाचे एकूण परदेशी कलेक्शन ४०८.५० कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
SACNILC च्या अहवालानुसार, ‘रामायण’चे जगभरातील एकूण कलेक्शन आता १,२२८ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. या कमाईमध्ये भारतीय बाजारपेठेचा वाटा ६६.७ टक्के, तर परदेशातील कमाईचा वाटा ३३.३ टक्के आहे. त्यामुळे या चित्रपटाने जागतिक बॉक्स ऑफिसवरही आपली मजबूत पकड निर्माण केली आहे.
हिंदी भाषिक प्रेक्षकांकडून सर्वाधिक प्रतिसाद
‘रामायण’च्या कमाईमध्ये हिंदी आवृत्तीचा मोठा वाटा आहे. गेल्या शनिवारी केवळ हिंदी आवृत्तीने १८,५५७ शोमधून ५३.७५ कोटी रुपयांची कमाई केली. आतापर्यंतच्या एकूण देशांतर्गत निव्वळ कमाईमध्ये हिंदी आवृत्तीचा वाटा ५२७.२५ कोटी रुपये आहे. म्हणजेच भारतातील एकूण निव्वळ कलेक्शनपैकी तब्बल ७६.९ टक्के कमाई हिंदी आवृत्तीतून झाली आहे.
रणबीर कपूरच्या ‘रामायण’ची बॉक्स ऑफिसवरील ही घोडदौड पाहता आगामी दिवसांत चित्रपट आणखी कोणते विक्रम आपल्या नावावर करतो, याकडे सिनेप्रेमींचं लक्ष लागलं आहे.