
(फोटो सौजन्य-सोशल मिडिया)
Tiger Shroff Attack: बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेने मनोरंजनविश्वात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाच्या तपासात आता नवनवीन माहिती समोर येत आहे. पोलिसांच्या तपासानुसार, आरोपींनी हल्ल्याच्या आठवडाभर आधीच टायगर श्रॉफच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली होती. ११ ऑक्टोबर रोजी आरोपी जुहू येथील पुष्पा नरसी पार्कमधील फुटबॉल मैदानावर गेले होते. मात्र, त्या दिवशी टायगर मैदानावर न आल्याने ते परतल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यानंतर १८ ऑक्टोबर रोजी याच परिसरात गोळीबाराची घटना घडली.
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, रेहान, फूल सिंग आणि हृतिक हे तिन्ही आरोपी ११ ऑक्टोबर रोजी जुहू येथील पुष्पा नरसी पार्कमधील फुटबॉल मैदानावर गेले होते. त्या दिवशीही त्यांनी टायगर श्रॉफला लक्ष्य करण्याची योजना आखली होती का, याचा तपास पोलीस करत आहेत. मात्र, टायगर मैदानावर न आल्यामुळे आरोपी कोणतीही घटना न घडवता परतल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
यानंतर १८ ऑक्टोबर रोजी आरोपी पुन्हा या मैदानाजवळ दिसून आले. सायंकाळी सुमारे ४.३० वाजण्याच्या सुमारास ते पुष्पा नरसी पार्कच्या प्रवेशद्वाराजवळ घुटमळत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपी वारंवार गेटजवळ फिरत होते आणि मैदानाच्या आत डोकावत होते. टायगर मैदानावर उपस्थित आहे की नाही, याची ते खात्री करत होते का, याचा तपास सुरू आहे.
टायगरच्या हालचालींवर इतर व्यक्तीही लक्ष ठेवून होत्या?
या प्रकरणात आणखी काही व्यक्ती सहभागी असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. आरोपींव्यतिरिक्त इतर व्यक्तीही टायगरच्या हालचालींवर लक्ष ठेवून होत्या आणि त्याच्या उपस्थितीची माहिती हल्लेखोरांपर्यंत पोहोचवत होत्या का, याचा तपास केला जात आहे.
यासाठी पोलीस सीसीटीव्ही फुटेज आणि कॉल डिटेल रेकॉर्ड्सची (CDR) तपासणी करत आहेत. आरोपींनी हल्ल्याची योजना कधी आखली, त्यामागील हेतू काय होता आणि या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग होता, हे शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे.
टायगरची कार वळताच गोळीबार
एफआयआरमध्ये नमूद माहितीनुसार, १८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजता टायगर श्रॉफ फुटबॉल मैदानावरून बीएमडब्ल्यू कारने परतत होता. त्यावेळी कार त्याचा चालक फिरदौस इब्राहिम बलोच चालवत होता. ते गेल्या २८ वर्षांपासून टायगरच्या कुटुंबासोबत काम करत असल्याची माहिती आहे.
मैदानावरून बाहेर पडल्यानंतर कार डावीकडे वळत असताना दोन हल्लेखोरांनी समोरून आणि डाव्या बाजूने गोळीबार केल्याचा उल्लेख एफआयआरमध्ये आहे. एका आरोपीने पांढऱ्या रंगाचा फुलांचा शर्ट आणि काळी पँट घातली होती, तर दुसऱ्याने फिकट निळ्या रंगाचा पूर्ण बाह्यांचा शर्ट आणि काळी पँट परिधान केली होती. तिसरा आरोपी चॉकलेटी टी-शर्ट आणि राखाडी पँट घालून मोटारसायकलसह थांबला होता. गोळीबारानंतर त्याने दोन्ही हल्लेखोरांना पळून जाण्यास मदत केल्याचा आरोप आहे.
गोळीबारात टायगर आणि चालक जखमी
एफआयआरनुसार, गोळीबारात चालक फिरदौस बलोच यांच्या डाव्या मनगटाला गोळी लागली. त्यांच्या उजव्या हाताच्या अनामिका बोटालाही दुखापत झाली होती. तक्रारीत टायगर श्रॉफच्या छातीला आणि उजव्या हाताला जखमा झाल्याचाही उल्लेख आहे.
गोळीबारानंतर चालकाने कारचा दरवाजा उघडून बाहेर पडल्याचे सांगितले जाते. त्यानंतर टायगर स्वतः चालकाच्या सीटवर बसला आणि जखमी चालकाला घेऊन सांताक्रूझ पोलीस ठाण्यात पोहोचला. पुढे पोलिसांनी दोघांनाही उपचारांसाठी सांताक्रूझ पश्चिम येथील नानावटी रुग्णालयात नेले.
फटाक्यांचा आवाज समजून लोकांचा गोंधळ
घटनेच्या वेळी फुटबॉल मैदानावर संघातील एका सदस्याचा वाढदिवस साजरा केला जात होता. काही वेळापूर्वीच फटाके फोडण्यात आले होते. त्यामुळे गोळीबाराचा आवाज ऐकून सुरुवातीला काही लोकांना फटाके फुटल्याचा भास झाला. मात्र, टायगर श्रॉफ आणि त्याचा चालक जखमी झाल्याची माहिती पसरताच मैदानाबाहेर गोंधळ उडाला.
टायगर नियमितपणे रविवारी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत पुष्पा नरसी फुटबॉल मैदानावर खेळण्यासाठी येत असल्याची माहितीही तपासात महत्त्वाची ठरत आहे. तो क्वचितच सामना चुकवत असल्याने आरोपींनी त्याच्या नेहमीच्या वेळापत्रकाचा अभ्यास केला होता का, याचा तपास पोलीस करत आहेत.
टायगर श्रॉफ आणि त्याच्या चालकाला ठार मारण्याच्या उद्देशाने गोळीबार करण्यात आला असावा, असा पोलिसांना संशय आहे. ११ ऑक्टोबर रोजी आरोपींनी केलेली कथित पाहणी आणि १८ ऑक्टोबर रोजी झालेला गोळीबार यांच्यात संबंध आहे का, हे तपासातून स्पष्ट होणार आहे.
या हल्ल्यामागील नेमका हेतू, आरोपींना कोणी मदत केली आणि या कटात आणखी कोणाचा सहभाग होता, याचा शोध घेण्यासाठी पोलीस सीसीटीव्ही फुटेज, कॉल डिटेल रेकॉर्ड्स आणि आरोपींच्या हालचालींची तपासणी करत आहेत. तपास पूर्ण झाल्यानंतरच या प्रकरणातील सर्व बाबी स्पष्ट होऊ शकतील.