
(फोटो सौजन्य -सोशल मीडिया)
Toxic Ott Release: अभिनेता यशचा बहुचर्चित ‘टॉक्सिक’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवरील कमाईमुळे चर्चेत आहे. अनेकदा प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलल्यानंतर हा चित्रपट २६ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. चित्रपटाने १३ दिवसांत जवळपास २५० कोटींचा टप्पा गाठला असला, तरी त्याचे तब्बल ५०० ते ६०० कोटी रुपयांचे बजेट पाहता ‘टॉक्सिक’ला अपेक्षित यश मिळाले नसल्याचे बोलले जात आहे.
आता या चित्रपटाच्या OTT प्रदर्शनाबाबतही मोठी चर्चा सुरू झाली आहे. ‘टॉक्सिक’च्या डिजिटल रिलीजची प्रतीक्षा करणाऱ्या प्रेक्षकांना आणखी काही काळ वाट पाहावी लागू शकते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाचे निर्माते आणि OTT प्लॅटफॉर्म यांच्यातील डिजिटल राइट्सची डील अद्याप अंतिम झालेली नाही.
‘टॉक्सिक’ प्रदर्शित होण्यापूर्वीच त्याच्या OTT रिलीजसाठी निर्मात्यांना सुमारे १५० कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती. मात्र, निर्मात्यांनी ही ऑफर स्वीकारण्याऐवजी तब्बल २०० कोटी रुपयांची मागणी केली. त्यामुळे डिजिटल राइट्सचा करार बराच काळ रखडल्याचे वृत्त आहे.
निर्मात्यांना चित्रपटाकडून मोठ्या बॉक्स ऑफिस कमाईची अपेक्षा होती. यशसोबत कियारा अडवाणी आणि नयनतारा यांसारखी स्टारकास्ट तसेच मोठ्या बजेटमुळे ‘टॉक्सिक’कडून मोठ्या व्यवसायाची अपेक्षा केली जात होती. त्यामुळे सुरुवातीला मिळालेली १५० कोटींची OTT ऑफर निर्मात्यांनी नाकारल्याचे सांगितले जाते.
मात्र, चित्रपटगृहात ‘टॉक्सिक’ प्रदर्शित झाल्यानंतर परिस्थिती बदलली. पहिल्या आठवड्यात चित्रपटाने चांगली कमाई केली असली, तरी दुसऱ्या आठवड्यात बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये मोठी घट झाल्याचे आकडे सांगतात.
रिपोर्ट्सनुसार, चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर OTT प्लॅटफॉर्म्सने निर्मात्यांसमोर तब्बल १५० कोटींच्या तुलनेत केवळ ३० कोटी रुपयांची ऑफर ठेवल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता निर्मात्यांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.
‘टॉक्सिक’ला प्रदर्शनानंतर संमिश्र आणि काही प्रमाणात नकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्याचे सांगितले जात आहे. याचा थेट परिणाम चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कामगिरीवर आणि त्यामुळे OTT डीलवरही झाल्याची चर्चा आहे.
याशिवाय OTT प्लॅटफॉर्मवर चित्रपटातील काही दृश्यांबाबत निर्बंध किंवा कपात केली जाऊ शकते, अशीही चर्चा आहे. त्यामुळे डिजिटल रिलीजपूर्वी चित्रपटाच्या कंटेंटमध्ये काही बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, याबाबत निर्माते किंवा संबंधित OTT प्लॅटफॉर्मकडून अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
यश, कियारा अडवाणी आणि नयनतारा यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘टॉक्सिक’ने पहिल्या आठवड्यात तब्बल २३९.३० कोटी रुपयांची कमाई केली.
दुसऱ्या शुक्रवारी चित्रपटाने १.७५ कोटी, शनिवारी २.२८ कोटी, तर रविवारी २.४२ कोटी रुपये कमावले. त्यानंतर सोमवारी चित्रपटाच्या कमाईत मोठी घट झाली आणि सुमारे १४ लाख रुपयांची कमाई झाल्याचे आकडे सांगतात.
यानुसार, चित्रपटाची आतापर्यंतची एकूण कमाई २४५.८९ कोटी रुपये झाली आहे.
आता ‘टॉक्सिक’ची OTT डील नेमकी किती रुपयांमध्ये होते आणि चित्रपटाला डिजिटल प्लॅटफॉर्मवर कोणत्या स्वरूपात रिलीज केले जाते, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.