बापरे! साडेतीन वर्षांच्या मुलाच्या फुफ्फुसातून बाहेर काढला LED बल्ब!
मुंबई : एका दुर्मिळ आणि असाधारण वैद्यकीय केसमध्ये जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमधील डॉक्टरांनी साडेतीन वर्षांच्या मुलाच्या फुफ्फुसात अडकलेला धातूचा एलईडी बल्ब यशस्वीरित्या काढला. ज्यामुळे तीन महिन्यांपासून त्याला सतत खोकला आणि श्वसनाचा होत असलेला त्रास अखेर दूर झाला. राहुल (गोपनीयतेसाठी नाव बदलले आहे) सुरुवातीला निदान झालेल्या न्यूमोनिया आजाराने ग्रस्त होता आणि अँटीबायोटिक्सचे अनेक औषधोपचार करण्यात आले. मोठ्या प्रमाणात काळजी घेतल्यानंतर देखील, त्याची लक्षणे कायम राहिली, ज्यामुळे त्याची प्रगत तपासणी करण्यात आली, ज्यामध्ये सीटी स्कॅन करण्यात आले. यामधून त्याच्या डाव्या ब्रोन्कसमध्ये खोलवर धातूचा भाग असल्याचे आढळून आले.
कोल्हापूरात फ्लेक्सिबल ब्रॉन्कोस्कोपीच्या अयशस्वी प्रयत्नांनंतर मुलाला जसलोक हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. जेथे ब्रॉन्कोस्कोपीमध्ये गिळण्यात आलेला एलईडी बल्ब ब्रोन्कस मध्ये आढळून आला. त्यानंतर डॉ. विमेश राजपूत आणि डॉ. दिव्य प्रभात यांनी मिनी थोरॅकोटॉमी (४ सेमी कट) केली, ज्यामुळे खेळण्यांच्या गाडीतून गिळलेला एलईडी बल्ब यशस्वीरित्या काढून टाकण्यात आला आणि मुलाच्या फुफ्फुसांचे कार्य पूर्ववत करण्यात आले. अॅनेस्थेसियोलॉजी सल्लागार डॉ. अनुराग जैन यांनी या शस्त्रक्रियेला मोठे सहकार्य केले.
या केसबाबत मत व्यक्त करत जसलोक हॉस्पिटलमधील थोरॅसिस सर्जन डॉ. विमेश राजपूत म्हणाले, “आम्ही ऑपरेट केलेली ही सर्वात दुर्मिळ केस होती. एलईडी बल्ब फुफ्फुसामध्ये खोलवर गेला होता आणि समकालीन उपचार पद्धती तो बल्ब बाहेर काढण्यामध्ये अयशस्वी ठरल्या. काळजीपूर्वक नियोजन केलेल्या मिनी थोरॅकोटॉमीसह आम्ही सुरक्षितपणे एलईडी बल्ब बाहेर काढला आणि मुलाला जीवनदान मिळाले.”
ईएनटी सर्जन डॉ. दिव्य प्रभात म्हणाल्या, “मुलांमध्ये अस्पष्ट आणि सतत दिसणाऱ्या श्वसनसंबंधित लक्षणाकडे कधीही दुर्लक्ष करू नये. यामुळे अनेकदा न्यूमोनिया किंवा इतर सामान्य आजारांमुळे अशा केसचे निदान होण्यास विलंब होतो. प्रगत इमेजिंगद्वारे लवकर निदान केल्यास परिणामांमध्ये लक्षणीय सुधारणा होऊ शकते आणि गुंतागूंत टाळता येऊ शकते.”
जागरूकतेच्या महत्त्वावर भर देत चीफ मेडिकल ऑफिसर डॉ. मिलिंद खडके म्हणाले, “मुलांनी एखादी वस्तू गिळणे हे पालकांच्या लक्षात न येणे स्वाभाविक आहे. वेळेवर वैद्यकीय लक्ष आणि स्पेशलिस्ट हस्तक्षेप फुफ्फुसाचे दीर्घकालीन नुकसान होण्याला प्रतिबंध करण्यासाठी महत्त्वाचे आहे. ही केस पालकांना व आरोग्यसेवा प्रदात्यांना मुलांमध्ये गंभीर, अनिश्चित श्वसनसंबंधित समस्या आढळून आल्यास दक्ष राहण्याची आठवण करून देते.”
आभार व्यक्त करत, मुलाचे वडील अविनाश पाटील म्हणाले, ”आम्हाला किती दिलासा मिळाला आहे ते शब्दात सांगता येऊ शकत नाही. तीन महिने आम्ही सतत भीतीच्या वातावरणात जगत होतो, आमच्या मुलाला काय झाले आहे हे आम्हाला कळत नव्हते. जसलोक हॉस्पिटलमधील अविश्वसनीय टीमचे आभार, आरव आता मोकळा श्वास घेत आहे आणि पुन्हा हसत आहे. या हॉस्पिटलने आमच्या मुलाला नवीन जीवन दिले आहे आणि आम्ही नेहमी त्यांचे आभारी राहू.”
या केसमधून मुलांमुधील गुंतागूंतीच्या श्वसनसंबंधित केसेसचे व्यवस्थापन करण्यामध्ये लवकर निदान, प्रगत इमेजिंग आणि स्पेशलिस्ट हस्तक्षेपाचे महत्त्व दिसून येते. जसलोक हॉस्पिटलने रूग्ण केअरमधील सर्वोत्तमता आणि प्रगत शस्त्रक्रिया कौशल्यासाठी आपली प्रतिष्ठा कायम ठेवली आहे, ज्यामधून सर्वात आव्हानात्मक केसेसमध्ये देखील यशस्वी निष्पत्तींची खात्री मिळते.