फोटो सौजन्य - Social Media
रामभाऊ आणि त्यांचा परिवार एका दुर्गम भागात अनेक वर्षांपासून रिकामा अशा बंगल्यामध्ये शिफ्ट होतात. सुरुवातीचे काही दिवस परिवारातील इतर सदस्यांसाठी उत्तम जात होते. घराच्या अवतीभवती सुंदर हिरवळ, समोर खोल दरी आणि ढगांना स्पर्श करणारे छत! काहींचे अगदी स्वप्न असणारे हे दृश्य, ते जगत होते म्हणून सगळे आनंदित होते. पण रामभाऊ मात्र अगदी पहिल्या दिवसापासून अस्वस्थ झाले. घरामध्ये पाऊल ठेवताच त्यांना भास होणे सुरु झाले.
एकदा तर रात्री बेडरूममध्ये झोपलेले असताना त्यांच्या खिडकीवर कुणी तरी जोरदार ठोठावत असल्याचे त्यांना जाणवले आणि त्यामुळे त्यांना अचानक जाग आली. दरवाजा उघडून पाहिल्यावर खोलीबाहेर मात्र कुणीच त्यांना दिसलं नाही. त्यांनी दरवाजा बंद केला आणि मागे वळले तर काय, खिडकीजवळ एक राखाडी आकृती उभी आहे. ती रामभाऊंच्या दिशेनेच नजर रोखून पाहत होती. आणि हा अनुभव त्यांचा रोजचा झाला होता. ही आकृती त्यांना दररोज दिसायला लागली. केवळ दिसायलाच नाही तर ती राखाडी आकृती त्यांच्याशी संवाद साधू लागली. त्यांनाही त्या आकृतीची सवय झाली, त्यामुळे ते इतर घरातल्यांना याबद्दल काहीच सांगू इच्छित नव्हते. जणू काही ती आकृती त्यांची मैत्रीणच झाली होती.
एकेदिवशी रामभाऊ आजारी पडले. हे आजारपण इतके वाढले की आताच जीव जाईल असं सगळ्यांना वाटू लागले. त्यांचा हा विचित्रपणा पाहून सर्वांनाच काळजी वाटू लागली. जेव्हापासून रामभाऊ आजारी पडले तेव्हापासून ते रामभाऊ मध्यरात्री किंचाळून उठू लागले होते, जसं कुणी तरी त्यांना मारत आहे. परिवारातील इतर सदस्यांनी वर जाऊन पाहिले तर तिथे काहीच घडत नसे, कारण त्यांना मात्र दिसताना रामभाऊ गाढ निद्रेत आहेत असंच दिसत होतं. असं अनेक दिवस सुरु राहिलं. घरातल्यांना नक्की काय करावे कळेनासे झाले.
अनेकदा तर रात्री पावलांचा आवाज येत असे. अखेर गावातल्यांना विचारून अनेक दिवसांनी त्या कुटुंबाने एका पुजाऱ्याला पूजा करण्यासाठी घरी आणले. पण ती पूजाही धड होईना, पूजेमध्ये विघ्न येऊ लागले. दरम्यान पुजाऱ्याने कुटुंबाला सांगितले की, तुम्ही फार मोठी चूक करत आहात. या घरात ‘ती’ सावली कुणालाही टिकू देणार नाही. रामभाऊ यांच्या अंगात त्याने प्रवेश केला आहे. आज रात्री मी काही विधी करून रामभाऊ यांना या त्रासातून मुक्त करेन त्यासाठी मला त्यांना भेटावे लागेल. त्या रात्री रामभाऊ यांच्यावर अनेक विधी करून त्यांना त्या त्रासातून मुक्तता दिली. आणि कुटुंबाने घर कायमचे सोडले. पण त्या पुजाऱ्याने मात्र दुसरा दिवस काही पाहिला नाही. काय घडले नक्की त्या पुजाऱ्याचे? तुम्हाला काय वाटतं. अजूनही त्या घरात घुमतोय पूजेचा आवाज….तुम्हाला तर नाही ना आला?