फोटो सौजन्य - Social Media
आजकाल अनेक लोक मद्यपान करतात. अगदी तरुण मंडळी तर मज्जा म्हणून हे सुरु करतात आणि नंतर मद्यपानाचे व्यसन लावून बसतात. काही जणांना तर मद्यपानाची इतकी सवय लागते की, दारूशिवाय राहणेही कठीण होते. विशेषतः पार्टी, सण-समारंभ यामध्ये दारूचे प्रमाण अधिकच वाढलेले दिसते. काही लोकांना वाटते की थोडंफार मद्यपान केल्यास शरीरावर फारसा परिणाम होत नाही, उलट काहीजण याला रिलॅक्स होण्याचा मार्ग मानतात. मात्र अलीकडे आलेल्या एका संशोधनाने हे संपूर्णपणे खोटं ठरवलं आहे.
या संशोधनात स्पष्टपणे दिसून आले आहे की जर एखादी व्यक्ती आठवड्यात किमान 8 पेग दारू घेत असेल, तरी त्याच्या मेंदूवर गंभीर परिणाम होऊ शकतात. या परिणामामुळे स्मरणशक्ती कमी होणे, विचार करण्याची क्षमता घटणे आणि भविष्यकाळात अल्झायमर सारखे आजार होण्याचा धोका वाढतो. हे संशोधन ‘न्यूरोलॉजी’ या वैद्यकीय जर्नलमध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहे. संशोधनात असे नमूद करण्यात आले आहे की जे लोक आठवड्यात 8 किंवा त्याहून अधिक पेग घेतात, त्यांच्या मेंदूमध्ये अशा प्रकारच्या बिघाडांचे निदान झाले आहे जे थेट डिमेन्शिया व अल्झायमरशी संबंधित आहेत.
संशोधकांनी 1700 पेक्षा जास्त मृत व्यक्तींच्या मेंदूंचा अभ्यास केला. या मृतांची सरासरी वय 75 वर्षे होती. त्यांच्या मेंदूमध्ये त्यांनी काही विशेष जखमा (lesions) आणि ‘टाउ प्रोटीन’ (tau protein) चे गाठी पाहिल्या. हे टाउ प्रोटीन अल्झायमरचा मुख्य संकेत मानले जाते. या मृत व्यक्तींच्या दारू पिण्याच्या सवयीबाबतची माहिती संशोधकांनी त्यांच्या कुटुंबीयांकडून मिळवली. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे ज्या लोकांनी खूप जास्त दारू प्यायली होती, त्यांच्यात मेंदूच्या नुकसानाचा धोका 133% अधिक होता. जे लोक दारू पिणे सोडून दिले होते, त्यांच्यातही हा धोका 89% अधिक होता, तर कधीमधी दारू पिणाऱ्यांमध्येही 60% अधिक धोका आढळून आला.
संशोधनात हेही दिसून आले की जे लोक दीर्घकाळ दारू घेतात, त्यांच्या मेंदूमध्ये अल्झायमरचे लक्षण अधिक प्रमाणात आढळते आणि त्यांचा मृत्यू सामान्य लोकांपेक्षा 13 वर्षांनी आधी होतो. संशोधनाचे लेखक अल्बर्टो फर्नांडो ओलिवेरा जस्टो यांनी सांगितले की जास्त दारू पिण्याचा मेंदूवर थेट परिणाम होतो आणि स्मरणशक्तीवरही याचा मोठा परिणाम होतो. लोकांनी याबाबत जागरूक होण्याची गरज आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.