फोटो सौजन्य - Social Media
त्वचेची अॅलर्जी ही केवळ खाज सुटणे एवढ्यापुरती मर्यादित नसते. अनेकदा यामुळे त्वचेला सूज, लालसरपणा, पुरळ, फोड किंवा जळजळ होऊ शकते. काही गंभीर प्रकरणांमध्ये त्वचेसंबंधी आजार, संसर्ग, डाग आणि असह्य वेदनाही होऊ शकतात. अॅलर्जीचे मूळ कारण ओळखून योग्य उपचार न केल्यास ती दीर्घकाळ राहू शकते. म्हणूनच अॅलर्जीच्या प्रकारांबद्दल, कारणांबद्दल आणि योग्य व्यवस्थापनाबद्दल माहिती असणे महत्त्वाचे ठरते. संबंधित माहिती त्वचारोगतज्ज्ञ डॉ. शरीफा चौसे यांनी पुरवली आहे.
त्वचेची अॅलर्जी अनेक प्रकारची असते. कॉन्टॅक्ट डर्माटायटीस ही सर्वाधिक सामान्य अॅलर्जी असून, यात त्वचा विशिष्ट घटकांच्या संपर्कात आल्यावर प्रतिक्रिया देते. उदाहरणार्थ – डिटर्जंट, साबण, परफ्युम, धातू किंवा रंग. दुसऱ्या प्रकारात एक्झिमा, अर्टिकेरिया (पित्त उठणे), अँजिओएडेमा (त्वचेखाली सूज) आणि एटोपिक डर्माटायटीस यांचा समावेश होतो. या अॅलर्जीत त्वचा कोरडी, जळजळ होणारी आणि अतिशय संवेदनशील होते, त्यामुळे दैनंदिन कामे देखील कठीण होतात.
अॅलर्जीची कारणेही अनेक असू शकतात. काहींना कृत्रिम कपडे, परागकण, धूळ, पाळीव प्राण्यांचे केस, बुरशी, कीटक चावणे यामुळे त्रास होतो. सौंदर्य प्रसाधनांतील रसायनांमुळे देखील त्वचेला त्रास होतो. काही लोकांना विशिष्ट अन्नपदार्थ, जसे की सुकामेवा, दूध, अंडी किंवा सीफूड यामुळे अॅलर्जी होते. काहींना उन्हात जास्त वेळ घालवल्याने, तापमानातील अचानक बदलामुळे किंवा मानसिक तणावामुळे देखील त्वचेवर परिणाम होतो.
दुष्परिणामांमध्ये तीव्र खाज, वेदना, त्वचेवर काळसर डाग, सूज किंवा फोडांचा समावेश होतो. वेळेत उपचार न केल्यास अॅलर्जीक ठिकाणी जंतुसंसर्ग होऊ शकतो. सौम्य अॅलर्जीसाठी डॉक्टरांनी सुचवलेले मॉइश्चरायझर आणि अँटी-हिस्टॅमिन औषधे उपयोगी ठरतात. तीव्र अॅलर्जीसाठी कॉर्टिकोस्टेरॉईड क्रीम्स किंवा ओरल औषधे आवश्यक असतात.
अॅलर्जी टाळण्यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे ओळखलेले ट्रिगर्स, जसे विशिष्ट खाद्यपदार्थ, सौंदर्यप्रसाधने, धूळ किंवा परफ्युम यांचा टाळता येईल तितका टाळावा. त्वचा नेहमी स्वच्छ ठेवणे, सौम्य स्किनकेअर प्रॉडक्ट्स वापरणे, पाणी भरपूर पिणे आणि डॉक्टरांचा सल्ला घेणे यामुळे अॅलर्जीवर नियंत्रण ठेवता येते. दीर्घकाळ त्रास होत असल्यास त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. योग्य वेळेवर निदान आणि उपचार केल्यास त्वचेची अॅलर्जी नियंत्रित करता येते आणि आरोग्यपूर्ण जीवन जगता येते.