15 मृत्यू, 130 गाड्या रद्द, 26 बचाव पथक तैनात…,आंध्र-तेलंगणामध्ये पुराचा कहर!
आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आंध्र प्रदेशात गेल्या 50 वर्षांचा विक्रम मोडला असून 5 दशकात येथे सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. एका दिवसात 37 सेमी पावसाची नोंद झाली आहे. विजयवाडा शहराचा 40 टक्के भाग पुराच्या पाण्यात बुडाला आहे. विजयवाडा येथील बुडामेरू नदीच्या पाण्याच्या पातळीत अचानक वाढ झाल्याने परिस्थिती गंभीर झाली आहे. आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू झाला असून तेलंगणामध्ये ही हीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. एनडीआरएफच्या 26 तुकड्या बचावकार्यासाठी तैनात करण्यात आल्या आहेत. या पुरपरिस्थितीमुळे 130 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
दरम्यान भारतीय हवामान विभागाने (IMD) यापूर्वीच याची घोषणा केली होती. आयएमडीने आपल्या बुलेटिनमध्ये म्हटले आहे की, शनिवारी आंध्र प्रदेशातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडू शकतो. या घोषणेसोबतच असे होण्याचे कारणही सांगण्यात आले.
हे सुद्धा वाचा: ‘आम्ही शांत बसणार नाही’… परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी पाकिस्तानला सुनावले खडे बोल
हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून त्यामुळेच मुसळधार पाऊस पडत आहे. पश्चिम मध्य आणि लगतच्या उत्तर पश्चिम बंगालच्या उपसागराला लागून असलेल्या उत्तर आंध्र प्रदेश आणि दक्षिण ओडिशावरील कमी दाबाचे क्षेत्र पश्चिम आणि वायव्य दिशेने सरकले आहे. शनिवारी पहाटे साडेपाच वाजेपर्यंत त्याचे दाबात रुपांतर झाले.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम मध्य आणि लगतच्या उत्तर पश्चिम बंगालच्या उपसागरात ताशी ५० किमी वेगाने वारे वाहत आहेत. यामुळे, शनिवारी उत्तर आंध्र प्रदेश आणि ओडिशा किनारपट्टीवर वादळी हवामानाची तीव्रता वाढेल आणि शनिवारी ताशी 65 किमी वेगाने वारे वाहतील असा अंदाज वर्तवण्यात आला होता. त्याचा परिणाम पश्चिम गोदावरीवरही झाला असून शुक्रवारी सायंकाळपासून पावसाला सुरुवात झाली. किनारपट्टीच्या जिल्ह्यांमध्ये पाऊस आणि पुरामुळे रस्ते जलमय झाले आहेत. गेल्या दोन दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे लाखो एकर रोपवाटिका आणि पिके पाण्याखाली गेली आहेत. कृष्णा, एनटीआर, गुंटूर, पालनाडू, एलुरु आणि पश्चिम गोदावरी जिल्ह्यांतील ४७ हून अधिक मंडळांमधील पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे.
हे सुद्धा वाचा: ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ‘हे’ दोन विद्यमान आमदार भाजपमध्ये दाखल
कृषी विभागाच्या अहवालानुसार मिरची, कापूस, धान आणि कडधान्य पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. अनियमित पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पेरण्या उशिरा झाल्या. तर याचसंदर्भात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू म्हणाले, अन्न आणि वैद्यकीय मदत पुरवण्यासाठी 110 बोटी तैनात करण्यात आल्या आहेत. पूर परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे आणि अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. त्याचवेळी विजयवाड्यातील प्रकाशम बॅरेजमधून 11 लाख क्युसेक पाणी सोडण्यात आले. सखल भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. विजयवाड्यात मुसळधार पाऊस पडत आहे.