अदाणींवरील आरोपांनंतर शेअर मार्केटमध्ये भूकंप; गुंतवणूकदारांचे २ लाख कोटी बुडाले
अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील सरकारी वकिलांनी अदाणी समूहाचे अध्यक्ष गौतम अदाणी यांच्यावर दोन हजार कोटी रुपयांची लाच दिल्याचा आरोप केला आहे. त्याचे पडसाद आज भारतीय शेअर बाजारात उमटले. अदाणी समूहाच्या शेअरमध्ये जवळपास २० टक्क्यांची घसरण झालेली पाहायला मिळाली. गौतम अदाणी आणि त्यांचा पुतण्या सागर अदाणी यांच्यासह इतर सात जणांनी सौर ऊर्जा वितरीत करण्याचे कंत्राट मिळविण्यासाठी भारतातील सरकारी अधिकाऱ्यांना २,०२९ कोटी रुपयांची (२६५ दशलक्ष डॉलर्स) लाच देण्याचा प्रयत्न केलाचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे अमेरिकेतील गुंतवणूकदारांचं नुकसान झाल्याचं अमेरिकेच्या सरकारी वकिलांनी म्हटलं आहे.
अदाणींसंदर्भातील बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
अदाणी एंटरप्राईजेस या अदाणी समूहाच्या प्रमुख कंपनीच्या शेअरमध्ये २० टक्क्यांची घसरण झाली. तर अदाणी ग्रीन एनर्जी कंपनीला कंत्राट मिळविण्याबद्दल लाच दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या कंपनीच्या शेअरमध्ये १९.१७ टक्क्यांची घसरण झालेली पाहायला मिळाली. अदाणी टोटल गॅस १८.१४ टक्के, अदाणी पॉवर १७.७९ टक्के आणि अदाणी पोर्ट्समध्ये १५ टक्क्यांची घसरण झाली आहे.
अंबुजा सिमेंट्सच्या शेअरमध्ये १४.९९ टक्के, ACC शेअरमध्ये १४.५४ टक्क्यांची घसरण पहायला मिळाली. अदाणी यांची समूह कंपनी असलेल्या एनडीटीव्हीच्या शेअरमध्येही १४.३७ टक्क्यांची घसरण झाली. तर अदाणी विल्मारमध्ये १० टक्क्यांची घसरण झाली आहे. शेअर मार्केट सुरू झाला त्याचंवेळी अदाणी समूहातील तीन प्रमुख कंपन्यांच्या शेअर्समध्ये २० टक्क्यांची घसरण झाली. अदाणीच्या ११ शेअरवर याचा परिणाम झाला आहे. अदाणी समूहाचे बाजारमूल्य २ लाख कोटींनी घटले. २०२३ मध्ये हिडेंनबर्ग अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर अदाणी समूहाला आतापर्यंत हा सर्वात मोठा फटका बसल्याचं बोललं जात आहे.
शेअर मार्केटसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
गौतम अदाणी पुन्हा संशयाच्या भोवऱ्यात सापडल्यानंतर लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि कॉँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी केंद्र सरकारलाही लक्ष्य केलं आहे. राहुल गांधींनी गौतम अदानी यांच्याबाबत दिल्लीत एक पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी उद्योगपती गौतम अदानी यांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. यावेळी राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. गौतम अदानी प्रकरणावर आम्ही शांत बसणार नाही. हा मुद्दा आम्ही संसदेत देखील मांडणार आहोत. भाजपचे सरकार अदानी यांना वाचवण्याचा प्रयत्न करू शकतं, असंही त्यांनी म्हटलं आहे.
जोपर्यंत नरेंद्र मोदी आणि गौतम अदानी एकत्र आहेत. तोवर ते सुरक्षित आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी गौतम अदानी यांना पाठीशी घालत आहेत. त्यामुळे सरकार त्यांच्यावर कोणतीही कारवाई करणार नाही. ते त्यांचं पूर्णपणे संरक्षण करणार आहेत. गौतम अदानी जेलमध्ये गेले तर पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील जेलमध्ये जातील. भाजपचा निधी त्यांच्याशी जोडलेला आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.