हरिद्वारच्या मानसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू
उत्तराखंडमधील हरिद्वार येथील प्रसिद्ध मानसा देवी मंदिरात रविवारी सकाळी चेंगराचेंगरी झाली. यात ६ जणांचा मृत्यू झाला आहे तर ३५ जण जखमी झाले आहेत. यातील अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. मंदिराच्या मुख्य रस्त्यावर मोठी गर्दी जमली होती. यावेळी मंदिर परिसरात विजेचा असल्याची अफवा पसरल्यानंतर भाविकांची भीतीने पळापळ सुरू झाली, त्यांनंतर चेंगराचेंगरी झाल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं.
सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिस आणि प्रशासकीय पथके तातडीने घटनास्थळी पोहोचली आणि मदतकार्य सुरू करण्यात आले. मात्र तोपर्यंत ६ जणांचा मृत्यू झाला होता. तर अनेक जण जखमी झाले होते. मृतदेह बाहेर काढण्यात आले. तसंच जखमींना तातडीने नजीकच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं. दरम्यान मुख्यमंत्री धामी यांनी घटनेनंतर शोक व्यक्त केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मानसा देवी अपघातावर दुःख व्यक्त केले आहे. ‘हरिद्वारमधील मानसा देवी मंदिर रस्त्यावर झालेल्या चेंगराचेंगरीत झालेल्या जीवित आणि मालमत्तेच्या नुकसानीमुळे मला खूप दुःख झालं आहे. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावलं आहे त्यांच्याप्रती मी संवेदना व्यक्त करतो आणि जखमीं लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना करतो. स्थानिक प्रशासन युद्धपातळीवर मदत करत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
प्राथमिक माहितीनुसार, ही घटना जिन्यावर घडली. पायऱ्यांमध्ये विद्युत प्रवाह सुरू असल्याची अफवा पसरली. त्यानंतर भाविकांमध्ये चेंगराचेंगरी झाली. तथापि, गढवालचे डीसी विनय कुमार यांनी विजेच्या धक्क्याची चर्चा फेटाळून लावली आहे.त्यांनी सांगितले की, अपघाताची कारणे तपासली जात आहेत. अपघातात ३५ जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे आणि ६ जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. हा अपघात सकाळी झाला, परंतु तेथील परिस्थिती सामान्य असल्याचं त्यांनी सांगितलं.
मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी या घटनेनंतर शोक व्यक्त केला आहे, ‘हरिद्वारमधील मानसा देवी मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीबद्दल अतिशय दुःखद बातमी मिळाली आहे. यूकेएसडीआरएफ, स्थानिक पोलिस आणि इतर बचाव पथके घटनास्थळी पोहोचली आहेत आणि मदत आणि बचाव कार्यात गुंतली आहेत. या संदर्भात, मी सतत स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात आहे आणि परिस्थितीवर सतत लक्ष ठेवले जात आहे. मी सर्व भाविकांच्या सुरक्षिततेसाठी माता राणीकडे प्रार्थना करतो, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.तसंच मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी २ लाख रुपये आणि जखमींना ५० हजार रुपयांची आर्थिक मदत त्यांनी जाहीर केली आहे.