संग्रहित फोटो
पुणे : राज्यात अपघाताच्या घटना वाढल्या असून, पुण्यातील बाणेर भागात रिक्षा चालकाने दिलेल्या धडकेत ज्येष्ठ नागरिक गंभीर जखमी झाला. त्यांना उपचारासाठी घेऊन जातो, अशी बतावणी करून रिक्षाचालकाने रिक्षात बसवले. त्यानंतर खडकीतील रेंजहिल्स परिसरात रेल्वे रूळाजवळ त्यांना जखमी अवस्थेत सोडून रिक्षाचालक पसार झाला. वेळेत उपचार न मिळाल्याने ज्येष्ठाचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी रिक्षाचालकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत ज्येष्ठ नागरिकाच्या मुलाने बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार रिक्षाचालकाविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २० जुलै रोजी दुपारी सव्वातीनच्या सुमारास ज्येष्ठ नागरिक हे काही कामानिमित्त बाहेर पडले. बाहेर पडताना त्यांनी पत्नीला सांगितले. त्यानंतर सायंकाळी सातपर्यंत ते घरी परतले नाही. त्यानंतर कुटुंबीयांनी नातेवाईक, तसेच निकटवर्तीयांकडे चौकशी केली. वडील घरी न परतल्याने मुलगा तक्रार देण्यासाठी बाणेर पोलीस ठाण्यात गेला. तो पोलिसांबरोबर बालेवाडी फाटा परिसरात गेला. त्यांनी बालेवाडी फाटा चौकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासले. तेव्हा सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास बाणेर परिसरातील बालेवाडी फाटा चौकातील न्यू पूना बेकरीसमोर रस्ता ओलांडणाऱ्या मुलाच्या वडिलांना रिक्षाचालकाने धडक दिल्याचे दिसून आले. चित्रीकरणात वडील जखमी झाल्याचे आढळले. अपघातानंतर तेथे गर्दी झाली.
नागरिकांकडून चोप बसेल, अशी भीती वाटल्याने रिक्षाचालकाने ज्येष्ठ नागरिकाला रिक्षातून रुग्णालयात घेऊन जातो, असे नागरिकांना सांगितले. गंभीर जखमी अवस्थेतील ज्येष्ठ नागरिकाला बालेवाडी फाटा परिसरातून रिक्षातून घेऊन विरुद्ध दिशेने बाणेरकडे रिक्षाचालक गेला. हा घटनाक्रम सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी टिपला होता. मात्र, उपचारांपूर्वीच ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले.
पुण्यात भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक
भरधाव कारने दिलेल्या धडकेत एका दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मुकुंदनगर भागात घडली आहे. याप्रकरणी पसार झालेल्या चालकाविरुद्ध स्वारगेट पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुकेश देवीलाल गुजर (वय २८, रा. झांबरे पॅलेसजवळ, महर्षीनगर) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याबाबत पोलीस कर्मचारी सुरेश गायकवाड यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे-नाशिक महामार्गावरील पेठजवळ टेम्पो पलटी
पुणे-नाशिक महामार्गावरील पेठ गावाच्या हद्दीत गुरुवार, २४ जुलै रोजी रात्री छोटा हत्ती टेम्पो पलटी होऊन झालेल्या अपघातात त्यामधील १० भाविक जखमी झाल्याची घटना घडली आहे. दरम्यान या अपघातास पाठीमागून आलेल्या इंडिका कारने टेम्पोला अचानक कट मारणे हे कारण असल्याचे चालक शरद वामन गायकवाड (रा. मालेगाव, जि. नाशिक) यांनी सांगितले.