
राजस्थानमध्ये भीषण अपघात; खडी भरलेला ट्रक कारवर उलटला; एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू
बुंदी : राजस्थानमधील बूँदी जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग ५२ वर भीषण अपघात झाला. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला. खडीने भरलेल्या ट्रकवरचे चालकाचे अचानक नियंत्रण सुटले. त्यानंतर एका कारवर ट्रक जाऊन धडकून उलटला. यात कारचा पूर्णपणे चुराडा झाला असून, त्यात बसलेल्या लोकांचा जागीच मृत्यू झाला. मृत्युमुखी झालेले सर्व एकाच कुटुंबातील सदस्य असल्याचे सांगण्यात येत आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, बुंदी जिल्ह्यातील सदर पोलिस स्टेशन परिसरातील सिलोर पुलाजवळ गुरुवारी सायंकाळी ६:३० च्या सुमारास हा अपघात झाला. टोंक जिल्ह्यातील पाच जण वाढदिवसाच्या समारंभात सहभागी होण्यासाठी कारने कोटा येथे जात होते. जयपूरहून कोटाकडे येणाऱ्या खडीने भरलेल्या ट्रकने मागून कारला धडक दिली. त्यात ट्रकचा एक टायर फुटला, ज्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले. त्यानंतर हा भीषण अपघात झाला.
याबाबत पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, या अपघातात टायर फुटल्यानंतर ट्रक चुकीच्या लेनमध्ये गेला. धडकेनंतर दोन्ही वाहने रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला घसरली गेली आणि ट्रक थेट कारवर उलटला. ट्रकने कारला मोठी धडक दिली की यामध्ये कारचा चुराडा झाला. यामध्ये कारमध्ये बसलेल्या तीन भावंडांसह चार जणांचा जागीच मृत्यू झाला.
मृतांची ओळख पटली
मृतांची ओळख पटली असून, मोइनुद्दीन (वय ६०), फरीउद्दीन (वय ४५), आझमीउद्दीन (वय ४०) आणि त्यांचा चुलत भाऊ सैफुद्दीन (वय २८) अशी यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या लोकांची नावे आहेत. हे सर्व टोंक जिल्ह्यातील रहिवासी होते. या अपघातात सैफुद्दीनचे वडील वसीउद्दीन (वय ६४) जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे आणि त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे वृत्त आहे.
क्रेनच्या साहाय्याने कार काढण्यात आली बाहेर
कार ट्रकखाली पूर्णपणे चिरडली गेली होती. क्रेनचा वापर करून ती बाहेर काढण्यात आली. काही तासांच्या प्रयत्नांनंतर मृतदेह बाहेर काढण्यात आले. मृतांच्या कुटुंबियांना माहिती देण्यात आली आहे. मृतदेह शवविच्छेदन तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत आणि पुढील कायदेशीर कारवाई केली जात आहे.
महामार्ग पुन्हा सुरू
पोलिसांनी सांगितले की, अपघातानंतर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. मात्र, नंतर ती पूर्ववत करण्यात आली. प्राथमिक तपासात ट्रकचा टायर फुटल्याने अपघात झाल्याचे दिसून येते. सविस्तर तपास सुरू आहे आणि ट्रक चालकाचीही चौकशी केली जात आहे.
हेदेखील वाचा : दिल्ली-आग्रा एक्सप्रेसवर भीषण अपघात; सहा बसेससह दोन कारमध्ये जोरदार धडक, वाहनांचे मोठं नुकसान