
उत्तर प्रदेशच्या उन्नावमध्ये भीषण अपघात; भरधाव ट्रकची वाहनांना धडक, दोन चिमुकल्यांसह चौघांचा मृत्यू
उन्नाव : उत्तर प्रदेशच्या उन्नावमध्ये भीषण अपघात झाला. भरधाव ट्रकने वाहनांना जोरदार धडक दिली. यामध्ये दोन चिमुकल्यांसह चौघांचा मृत्यू झाला. बुधवारी रात्री ११:३० च्या सुमारास लखनऊ-कानपूर महामार्गावरील सोहरामऊ पोलिस स्टेशन परिसरातील भल्ला फार्म चौकात हा अपघात झाला. दुचाकीवरून लग्न समारंभातून परतणाऱ्या कुटुंबावर काळाने घाला घातला. या चौघांनाही ट्रकने चिरडले.
शहरातील रहिवासी असलेले वीरेंद्र (वय ३५) बुधवारी लखनऊच्या दयालखेडा गावात लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी त्यांच्या कुटुंबासह गेले होते. समारंभानंतर, ते त्यांची पत्नी रितू (वय ३३), मुलगी अनुराधा (९) आणि मुलगा रुद्र (६) यांच्यासह दुचाकीवरून घरी परतत होते. त्यांची मोठी मुलगी नॅन्सी (१५) ही वीरेंद्रचा मेहुणा रणजीतची बाईकवर होती. त्यामुळे ती सुदैवाने वाचली. भल्ला फार्म चौकात वीरेंद्रचा मेहुणा रणजीत मागे नसल्याने वीरेंद्रने बाईक थांबवली आणि त्याची वाट पाहू लागला. तेवढ्यात एका वेगाने येणाऱ्या ट्रकने पुढे जाणाऱ्या कंटेनरला धडक दिली, ज्यामुळे कंटेनर महामार्गावर उलटला.
हेदेखील वाचा : Mumbai Goa Highway : महामार्गावर भीषण अपघात; गॅस सिलेंडर वाहून नेणाऱ्या वाहनाचा स्फोट
दरम्यान, चालक पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना, ट्रक अनियंत्रित झाला आणि बाईकवरून जाणाऱ्या कुटुंबाला चिरडले. अपघातात जोडपे आणि त्यांची दोन मुले मृत्युमुखी पडली. मोठी मुलगी तिचा मेहुणा रणजीतसोबत होती, त्यामुळे ती वाचली. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताबडतोब बाजूला केले.
मुंबई-गोवा महामार्गावरही अपघात
अपघाताच्या घटना सातत्याने घडत असल्याचे दिसत आहे. त्यात काही दिवसांपूर्वीच, मुंबई-गोवा महामार्गावर अपघाताचं सत्र कायमच सुरु आहे. यात आणखी भर म्हणजे गॅस सिलेंडर वाहून नेणाऱ्या वाहनाला आग लागल्याने भीषण अपघात झाला. पेण नगरपालिका हद्दीत हा अपघात घडला असून दोन्ही बाजूची वाहतूक कोंडी झाली.महामार्गावर पेण तालुक्यातील वाशी- उंबर्डे फाटा येथे ही घटना घडली आहे.