दिल्ली-आग्रा एक्सप्रेसवर भीषण अपघात; सहा बसेससह दोन कारमध्ये जोरदार धडक, वाहनांचे मोठं नुकसान
मथुरा : उत्तर प्रदेशातील मथुरा येथे दिल्ली-आग्रा एक्सप्रेसवेवर भीषण अपघात झाला. अनेक वाहनांमध्ये जोरदार धडक झाली. ज्यामुळे वाहनांना आग लागली. दाट धुक्यामुळे महामार्गावर काही स्पष्ट दिसू शकत नव्हते. परिणामी, सहा बस आणि दोन कार एकमेकांना धडकल्या. ज्यामुळे मोठी आग लागली. त्यातील अनेक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
सध्या मिळत असलेल्या माहितीनुसार, दाट धुक्यामुळे आग्रा-मथुरा एक्सप्रेसवेवर बसची धडक पहाटे चार वाजण्याच्या सुमारास घडली. चार बसेसना आग लागली आणि एक कारही जळून खाक झाल्याचे वृत्त आहे. पोलिस आणि अग्निशमन दलाच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आग विझवण्याचे काम सुरू केले. मदत आणि बचाव कार्य सध्या सुरू आहे आणि अपघातामुळे एक्सप्रेसवेवरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. तसेच टोल प्लाझावरही वाहनांच्या रांगाच रांगा लागल्याचे पाहिला मिळत आहे. काही लोक जखमी झाल्याची माहिती आहे, परंतु अधिकृत पुष्टीची वाट पाहिली जात आहे.
दरम्यान, या अपघातातील मृत्यूची अधिकृत नोंद झालेली नसली तरी, व्हिडिओंवरून मोठ्या प्रमाणात जीवित आणि मालमत्तेचे नुकसान झाल्याचे दिसून येते. त्यामुळे अनेक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
बचाव पथकाकडून तातडीने मदतकार्य सुरु
पोलिस आणि प्रशासनाच्या पथकांनी तातडीने बचाव आणि मदतकार्य सुरू केले. जखमींना रुग्णवाहिकेद्वारे जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले असून, त्याठिकाणी त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त आहे. प्रशासनाने जखमींवर तातडीने उपचारांसाठी रुग्णालयांना आवश्यक सूचना दिल्या आहेत.
एक्सप्रेस वेवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प
अपघातानंतर एक्सप्रेस वेवरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली. सुरक्षेच्या कारणास्तव, मार्ग तात्पुरता बंद करण्यात आला आणि वाहने पर्यायी मार्गांनी वळवण्यात आली. आग विझवल्यानंतर आणि नुकसान झालेल्या बसेस हटवल्यानंतर, वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येत आहे.
अपघाताच्या कारणासाठी तपास सुरु
अधिकाऱ्यांनी सांगितले की, या अपघाताचे कारण तपासले जात आहे. या अपघातामुळे एक्सप्रेस वेवरील सुरक्षा व्यवस्थेवर आणि बसेसच्या तांत्रिक तपासणीवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत.
हेदेखील वाचा : धुक्याने केला गेम! ‘या’ Eastern Expressway वर वाहनांची एकमेकांना भीषण टक्कर; जखमींची संख्या…






