'दिल्लीपासून बिहारपर्यंत ...', अरविंद केजरीवाल यांची मोठी घोषणा; निवडणुकांच्या तोंडावर इंडिया आघाडीला धक्का
बिहार विधानसभा निवडणुकीस अवघे काही महिने उरले असताना राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी, ‘आम आदमी पार्टी बिहार विधानसभा निवडणूक कोणत्याही पक्षाशी युती न करता स्वतंत्रपणे लढवणार आहे, अशी घोषणा केली आहे. त्यामुळे ऐन निवडणुकांच्या तोंडावर इंडिया आघाडीला हा मोठा धक्का मानला जात आहे.
गुजरात दौऱ्यावर असलेल्या केजरीवालांनी अहमदाबादमध्ये पक्षाच्या सदस्यता अभियानाच्या उद्घाटनादरम्यान प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नुकत्याच पार पडलेल्या विसावदर पोटनिवडणुकीचा दाखला देत सांगितलं की, ‘काँग्रेसपासून वेगळी निवडणूक लढून ‘आप’ने तिप्पट मतांच्या फरकाने विजय मिळवला आहे. ही जनतेची स्पष्ट प्रतिक्रिया आहे की ‘आप’ आता एक मजबूत पर्याय म्हणून लोकांपुढे उभी राहत असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
केजरीवालांनी काँग्रेसवर थेट निशाणा साधत म्हणाले की, “INDIA आघाडी ही फक्त लोकसभा निवडणुकीपुरती मर्यादित होती. आता आपचा काँग्रेससोबत कोणताही युतीचा संबंध नाही. जर युती असती, तर काँग्रेसने गुजरातच्या विसावदर पोटनिवडणुकीत आमच्याविरोधात उमेदवार का उभा केला असता? आपची मतं फोडण्यासाठी काँग्रेसला भाजपने पाठवलं होतं”, असा दावा त्यांनी यावेळी केला.
“भाजप आणि काँग्रेस यांचं नातं म्हणजे प्रेमी-प्रेमिकेसारखं आहे – रात्री चोरीछुपे भेटतात.”, असा आरोप त्यांनी केला. विसावदर पोटनिवडणुकीत AAP चे उमेदवार गोपाल इटालिया यांनी भाजपचे किरीट पटेल यांचा १७,५८१ मतांनी पराभव केला, तर काँग्रेस तिसऱ्या स्थानी राहिली. या विजयानंतर ‘आप’ने गुजरातमध्येही आपली ताकद वाढवण्यास सुरुवात केली केल्याचं चित्र आहे.
गुजरातविषयी बोलताना केजरीवाल म्हणाले, “AAP गुजरातमध्ये पूर्ण ताकदीनिशी लढेल आणि विजय मिळवेल. राजकारणात हार-जीत होत असते. पण आमचा आत्मविश्वास कायम आहे. पंजाबमध्ये पुन्हा आमचं सरकार येईल, यावर मला पूर्ण विश्वास आहे. तिथे आम्ही चांगलं काम केलं आहे.”
केजरीवालांच्या या घोषणेमुळे आप’ पक्ष आता राष्ट्रीय पातळीवर स्वतंत्र रणनीती स्वीकारतो आहे. काँग्रेस किंवा अन्य विरोधी पक्षांपासून अंतर ठेवत AAP आपली एक स्वतंत्र ओळख प्रस्थापित करू पाहतो आहे. आगामी बिहार आणि गुजरात विधानसभा निवडणुकांमध्ये ‘आप’ची कामगिरी कशी असेल, याकडे देशाचं लक्ष लागलं आहे.
बिहारमध्ये २०२५ च्या ऑक्टोबर-नोव्हेंबरदरम्यान विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. मागील निवडणुकीत NDA ने २४३ पैकी १२५ जागा जिंकत सत्ता स्थापन केली होती. मात्र, नंतर मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी भाजपचा हात सोडून RJD सोबत महागठबंधन सरकार बनवलं. मात्र जानेवारी २०२४ मध्ये नीतीश कुमारांनी पुन्हा एकदा मोठा राजकीय पलटवार करत RJD ला सोडचिठ्ठी देत NDA मध्ये पुनरागमन केलं आणि भाजपसोबत पुन्हा सरकार स्थापन केलं. त्यामुळे आगामी निवडणुकीत बिहारमध्ये NDA विरुद्ध INDIA ब्लॉक अशी लढत अपेक्षित असताना ‘आप’ने युतीबाहेर राहण्याचा घेतलेला निर्णय विरोधकांचं गणित बिघडवण्याची शक्यता आहे.