
नवी दिल्ली : नागरिकत्व सुधारणा कायदा अर्थात सीएए (Citizenship Amendment Act) लागू करण्याची केंद्र सरकारकडून तयारी सुरु झाली आहे. हा कायदा लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी अमलात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. केंद्र सरकारच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, ‘नागरिकत्व सुधारणा कायदा 2019’ चे नियम लोकसभा निवडणुकीच्या खूप आधी अधिसूचित केले जातील.
नागरिकत्व सुधारणा कायदा लोकसभा निवडणुकीपूर्वी (2024) लागू केला जाऊ शकतो. या अधिकाऱ्याने सांगितले की, सरकार लवकरच CAA चे नियम जारी करणार आहे. नियम जारी झाल्यानंतर, कायद्याची अंमलबजावणी केली जाऊ शकते. जेणेकरून पात्र लोकांना भारतीय नागरिकत्व दिले जाऊ शकते. चार वर्षांपेक्षा जास्त विलंबानंतर आता CAA च्या अंमलबजावणीसाठी नियम आवश्यक आहेत.
संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन असेल
अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, नियमांसोबतच ऑनलाईन पोर्टलही तयार आहेत. संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन असेल. अर्जदारांना त्यांनी कागदपत्रांशिवाय भारतात प्रवेश केल्याचे वर्ष सांगावे लागेल. अर्जदारांकडून कोणतीही कागदपत्रे मागितली जाणार नाहीत.
कधी प्रसिद्ध होणार अधिसूचना?
चर्चेदरम्यान, वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याला विचारण्यात आले की, एप्रिल-मेमध्ये लोकसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे, त्याआधी CAA अधिसूचित केले जाईल का? याला उत्तर देताना अधिकाऱ्याने सांगितले की, लोकसभा निवडणुकीपूर्वी हे केले जाईल.
2019 मध्ये करण्यात आला कायदा
वास्तविक, या कायद्यानुसार, 31 डिसेंबर 2014 पर्यंत बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातून भारतात आलेल्या गैर-मुस्लिम (हिंदू, शीख, जैन, बौद्ध, पारशी आणि ख्रिश्चन) यांना भारतीय नागरिकत्व दिले जाईल.