गुजरात एटीएसची मोठी कारवाई: अल-कायदाशी संबंधित ४ दहशतवाद्यांना अटक
गुजरात दहशतवादविरोधी पथकाला (ATS) दहशतवादाविरुद्ध आणखी एक मोठे यश मिळाले आहे. अल-कायदा इन इंडियन सबकॉन्टिनेंटशी (AQIS) संबंधित धोकादायक दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश करण्यात आला असून चार संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश, दिल्ली आणि गुजरातमधून ही अटक करण्यात आली आहे.
मोहम्मद फैक मुलगा मोहम्मद रिझवान, रहिवासी फरासखाना, दिल्ली
मोहम्मद फरदीन मुलगा मोहम्मद रईस, रहिवासी फतेहवाडी, अहमदाबाद
सैफुल्ला कुरेशी मुलगा मोहम्मद रफिक, रहिवासी भोई वाडा, मोडासा
झीशान अली मुलगा आसिफ अली, रहिवासी सेक्टर ६३, नोएडा
चारही दशतवादी एक्यूआयएसचे सक्रिय सदस्य होते. अल-कायदाच्या कट्टरपंथी विचारसरणीचा प्रसार करण्यात आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तसेच काही संशयास्पद अॅप्सद्वारे नवीन लोकांची भरती करण्याचं काम सुरू होतं. दरम्यान, त्यांची सखोल चौकशी सुरू झाली आहे. लवकरच पत्रकार परिषद घेऊन प्रकरणाची संपूर्ण माहिती सविस्तर दिली जाईल, असं एटीएसचे डीआयजी सुनील जोशी यांनी सांगितलं.
भारतीय बनावट चलनाशी संबंधित प्रकरणांमध्येही यांचा सहभाग होता. अल-कायदामध्ये सामील झाल्यानंतर त्यांची विचारसरणी कट्टरपंथी बनली होती. ते व्हॉट्सअॅप ग्रुप्सद्वारे सक्रिय होते आणि इतरांना जोडण्याचा प्रयत्न करत होते. एटीएस बराच काळ त्यांच्यावर लक्ष ठेवून होते आणि ठोस पुरावे गोळा केल्यानंतर चौघांनाही अटक करण्यात आली. त्यापैकी तिघांना उत्तर प्रदेश आणि दिल्लीतून पकडण्यात आले, तर एका दहशतवाद्याला गुजरातच्या अरवली जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने मध्य प्रदेशातील इंदूर येथून बब्बर खालसा इंटरनॅशनलशी (बीकेआय) संबंधित वॉन्टेड दहशतवादी आकाश दीप उर्फ बाजला अटक केली आहे. आकाश दीपवर ७ एप्रिल २०२५ रोजी पंजाबमधील बटाला येथील किला लाल सिंग पोलिस स्टेशनवर झालेल्या ग्रेनेड हल्ल्यात सहभागी असल्याचा आरोप आहे. बीकेआयने सोशल मीडियावर या हल्ल्याची जबाबदारी घेतली होती.
गुजरात एटीएस आणि दिल्ली पोलिसांच्या या कारवाईवरून स्पष्ट होते की भारत दहशतवादाविरुद्ध शून्य सहनशीलतेच्या धोरणावर काम करत आहे. AQIS आणि BKI सारख्या संघटनांविरुद्ध सतत सुरू असलेल्या कारवाया दहशतवाद्यांना एक मजबूत संदेश आहेत. गुजरात एटीएसची ही कारवाई गेल्या काही वर्षांत अल-कायदा आणि इतर दहशतवादी संघटनांविरुद्ध केलेल्या अनेक यशस्वी कारवायांच्या मालिकेतील आणखी एक कामगिरी आहे. तपास संस्था आता दहशतवादी नेटवर्क उघड करण्यात गुंतल्या आहेत.
अल-कायदा इन इंडियन सबकॉन्टिनेंट (AQIS) ही अल-कायदाची दक्षिण आशियाई शाखा आहे. भारत आणि शेजारील देशांमध्ये दहशतवादी कारवाया करण्याचा कट ही संघटना रचत असते. ही संघटना तरुणांना कट्टरतावादी बनवण्यासाठी आणि सोशल मीडियाचा वापर करून दहशतवादी हल्ल्यांचे नियोजन करण्यासाठी प्रसिद्ध आहे. गुजरात एटीएसने यापूर्वी २०२३ मध्ये चार बांगलादेशी नागरिकांच्या अटकेसह AQIS शी संबंधित मॉड्यूलचा पर्दाफाश केला होता.