Kedarnath Temple : आता केदारनाथ मंदिर परिसरात कॅमेरा, मोबाईलला 'नो एंट्री'; रिल्स-व्हिडिओ बनवाल तर थेट...
देहरादून : उत्तराखंड येथील केदारनाथ हे मंदिर प्रसिद्ध आहे. हजारो भाविक येथे दर्शनाला जात असतात. तेथे गेल्यावर फोटो-व्हिडिओ काढणे सोपं होतं. पण, आता या नियमांत बदल करण्यात आला आहे. केदारनाथ धाममध्ये मंदिराच्या तीस मीटरच्या परिघात मोबाईल फोन आणि कॅमेऱ्यांना पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. रील्स आणि व्हिडिओ बनवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.
केदारनाथ मंदिराच्या परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने अनेक महत्त्वपूर्ण बदल केले जातात. त्यातच आता हा नवा नियम लागू केला जात आहे. इतकेच नाहीतर तपासणीसाठी पोलिस आणि प्रशासनाची मदत घेतली जाणार आहे. श्री बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीनेही याबाबत माहिती दिली आहे. धामचे महत्त्व आणि प्रतिष्ठा सर्वात जास्त आहे. त्यानुसार, काही निर्णय घेतले जात आहेत. श्री बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीने 2 मे पासून सुरू होणारी केदारनाथ यात्रा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी तयारी केली आहे. मंदिर परिसरात रील्स, व्हिडिओ, फोटोग्राफी करण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.
यावेळी, मंदिराच्या आवारात मंदिराच्या तीस मीटरच्या परिघात कोणत्याही यात्रेकरूला सोशल मीडियाशी संबंधित डिव्हाईसेस घेऊन जाता येणार नाही. त्यासाठी येथे तपासणीची व्यवस्था करण्यात येणार आहे. पोलिसांसह आयटीबीपी आणि मंदिर समितीचे कर्मचारी तैनात असणार आहेत.
भाविकांना दर्शन सुलभ व्हावे ही प्राथमिकता
श्री बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीच्या पदाधिकाऱ्याने सांगितले की, ‘केदारनाथ मंदिराची प्रतिष्ठा राखणे आणि यात्रेकरूंना ते सुलभ करणे ही प्राथमिकता आहे. मंदिर परिसरात रिल्स आणि व्हिडिओ बनवण्यास परवानगी दिली जाणार नाही. मंदिरात कोणत्याही यात्रेकरूला मोबाईल फोन किंवा कॅमेरा घेऊन जाण्याची परवानगी नसेल’.