Malgeaon Bomb Blast: 'मोदी-योगींचे नाव घ्या...' साध्वीचे खळबळजनक खुलासे; तुरुंगातील अत्याचारावर केले भाष्य
Pradnya Singh: महाराष्ट्रातील मालेगावमध्ये रमजानच्या आदल्या दिवशी बॉम्बस्फोट झाला होता. मालेगाव येथील भिक्कू चौकामध्ये 29 सप्टेंबर 2008 रोजी हा स्फोट झाला. हा स्फोट नवरात्री आणि रमजान महिन्याच्या पूर्वसंध्येला होता. या स्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला होता आणि 100 जण जखमी झाले होते. या प्रकरणाचा तब्बल 17 वर्षानंतर निकाल हाती आला आहे. यामधील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणात आता माजी भाजप खासदार साध्वी प्रज्ञांच्या दाव्याने एकच खळबळ उडाली आहे. माझ्यावर पंतप्रधान मोदींचे नाव घेण्यासाठी दबाव होता.
प्रज्ञा सिंह यांचा दावा काय?
माझ्यावर नरेंद्र मोदी, मोहन भागवत, योगी आदित्यनाथ, सुदर्शन, इंद्रेश, रामजी माधव यांची नावे घेण्यासाठी दबाव टाकण्यात आला होता. मी जर यांचे नाव घेतले तर ते मला मारणार नाहीत असे ते मला सांगत होते. माझ्याकडून त्यांची नावे वदवून घेण्यासाठी मला त्रास दिला जात होता. मला ते खोटे बोलण्यास सांगत होते.
भाजपच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञा म्हणाल्या, माझा तुरुंगात माझा मानसिक आणि शारीरिक छळ केला गेला. कठोर छळ करून त्यांना हवे तसे त्यांनी मला बोलायला लावण्याचा प्रयत्न केला. मात्र मी खोटे बोलले नाही.
साध्वी प्रज्ञाचा आरोप अन् एकनाथ शिंदे आक्रमक
साध्वी प्रज्ञा यांनी केलेले आरोप अत्यंत गंभीर आहेत. एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याने मालेगाव प्रकरणात मोहन भागवतांचे नाव घेण्यासाठी दबाव असल्याचे म्हटले होते. साध्वी प्रज्ञा यांनी प्रधानमंत्री मोदी यांचे नाव घ्यावे, यासाठी त्यांना त्रास दिला. त्यासाठी त्यांचा मानसिक आणि शारीरिक छळ केला. तत्कालीन सरकार आणि काँग्रेस पक्ष हिंदुत्वाच्या विरोधात हिंदुत्वाचा अपमान करून मतांच्या राजकारणासाठी कोणत्याही ठरला जाऊ शकतात. तत्कालीन राज्यकर्ते होते ते म्हणत होते दहशतवादाला कुठलाही रंग नसतो, कुठलाही धर्म नसतो, पण याच लोकांनी मालेगाव ब्लास्ट मध्ये सांगितले की, हा भगवा आतंकवाद आहे, भगवा दहशतवाद आहे. मोहन भागवत असतील, पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, हे कट्टर देशभक्त आहेत. हे देशाला पुढे नेणारे व्यक्तिमत्व आहेत. अशा व्यक्तिमत्त्वावर आरोप करून, खऱ्या अर्थाने भगवा दहशतवाद सिद्ध करण्याचा मनसुबा, कारस्थान, षडयंत्र, तत्कालीन काँग्रेस सरकारने रचला होता.