BJP Foundation Day: गेल्या 10 वर्षांपासून भारतात सत्तेत असलेल्या आणि जगातील सर्वात मोठा पक्ष अशी ओळख असलेल्या भारतीय जनता पक्षाचा आज स्थापना दिवस आहे. भाजपची स्थापना ६ एप्रिल १९८० रोजी झाली. चार दशाकांहून अधिक काळापासून भाजप भारतीय राजकारणात सक्रीय आहे. चार दशकांत भाजपने लोकसभेत २ जागांवरून ३०३ जागांपर्यंतचा मोठा पल्ला गाठला आहे. अटल बिहारी वाजपेयींपासून लालकृष्ण अडवाणी यांच्या जोडीपासून ते मोदी-शहा जोडीपर्यंत, पक्षाने प्रत्येक दशकात नवीन उंची गाठली. रामजन्मभूमी चळवळीतून भाजपला मोठी ओळख मिळाली.
भाजपची अधिकृत स्थापना ६ एप्रिल १९८० रोजी झाली, मात्र त्याची मुळे भारतीय जनसंघ या पूर्वीच्या राजकीय संघटनेत आहेत. भारताच्या शेजारील पाकिस्तान आणि बांगलादेशमधील हिंदू अल्पसंख्याकांवरील कथित अत्याचारांबाबत भारत सरकारने मौन बाळगल्याने, डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी पंडित नेहरूंच्या मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर २१ ऑक्टोबर १९५१ रोजी त्यांनी भारतीय जनसंघाची स्थापना केली. डॉ. मुखर्जी यांच्या नेतृत्त्वात जनसंघाने जम्मू आणि काश्मीरला दिलेल्या विशेष दर्जाचा तीव्र विरोध केला. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांना अटक करण्यात आली, आणि त्यानंतर कारागृहात त्यांचा मृत्यू झाला. या मृत्यूबाबत अनेक शंका उपस्थित करण्यात आल्या होत्या.
2 लाखांपेक्षा अधिक दिवे उजळवले जाणार; अयोध्येत रामभक्तांवर ‘सरयू’चा वर्षाव
१९६७ साली, दीनदयाळ उपाध्याय यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनसंघाने काँग्रेसविरोधी लाट तयार केली आणि अनेक राज्यांत काँग्रेसची एकहाती सत्ता खिळखिळी केली. याच दरम्यान काँग्रेसला अनेक राज्यांत पराभवाचा सामना करावा लागला. पुढे १९७७ मध्ये इंदिरा गांधींनी आणीबाणी समाप्त करून सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली. त्यावेळी जयप्रकाश नारायण यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सर्व विरोधी पक्ष एकत्र आले आणि ‘जनता पक्ष’ या नव्या राजकीय आघाडीची स्थापना झाली. १ मे १९७७ रोजी भारतीय जनसंघ या नव्याने स्थापन झालेल्या जनता पक्षात विलीन झाला.
मात्र, जनता पक्षाचे सरकार फार काळ टिकले नाही. पक्षांतर्गत संघर्ष आणि परस्पर विरोधामुळे मतभेद वाढले. विशेषतः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित सदस्यांविषयी वाद निर्माण झाले, आणि अशा व्यक्तींनी पक्षात राहू नये, अशी भूमिका समोर आली. परिणामी, ६ एप्रिल १९८० रोजी भारतीय जनता पक्षाची स्वतंत्रपणे स्थापना झाली. अटलबिहारी वाजपेयी हे या नव्या पक्षाचे पहिले अध्यक्ष झाले. १९८४ च्या लोकसभा निवडणुकीत, इंदिरा गांधी यांच्या हत्येमुळे निर्माण झालेल्या सहानुभूतीच्या लाटेमुळे भाजपला केवळ दोन जागा मिळाल्या.
१९८९ मध्ये, बोफोर्स प्रकरण आणि इतर घडामोडींमुळे भाजपची ताकद वाढू लागली, आणि या निवडणुकीत पक्षाने ८५ जागा मिळवल्या. त्याच काळात रामजन्मभूमी आंदोलनाला भाजपने समर्थन दिले. लालकृष्ण अडवाणी यांनी सोमनाथपासून राम रथयात्रा सुरू केली, ज्यामुळे पक्षाच्या लोकप्रियतेत वाढ झाली. बिहारमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांनी अडवाणींना अटक करण्याचे आदेश दिले, पण यामुळे चळवळीला अधिकच वेग मिळाला. १९९१ मध्ये लोकसभा निवडणुकीत पक्षाने १२० जागांवर विजय मिळवला. १९९३ मध्ये उत्तर प्रदेश, दिल्ली, राजस्थान, हिमाचल प्रदेश आणि मध्य प्रदेशात पक्षाचा प्रभाव वाढला. १९९५ मध्ये भाजपने आंध्रप्रदेश, कर्नाटक, बिहार, ओडिशा, गोवा, गुजरात आणि महाराष्ट्र यांसारख्या अनेक राज्यांत आपली उपस्थिती मजबूत केली.
१९९६ साली भाजपने १६१ जागांवर विजय मिळवून लोकसभेतील सर्वात मोठा पक्ष म्हणून उदय केला. अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान झाले, परंतु स्पष्ट बहुमत नसल्यामुळे त्यांचे सरकार केवळ १३ दिवस टिकले. त्यानंतर १९९८ मध्ये झालेल्या मध्यावधी निवडणुकीनंतर भाजपने इतर मित्रपक्षांसह राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) स्थापन केली आणि सत्ता हस्तगत केली. मात्र, १९९९ मध्ये अण्णाद्रमुकने पाठिंबा मागे घेतल्यामुळे पुन्हा सरकार कोसळले. त्यानंतर ऑक्टोबर १९९९ मध्ये झालेल्या निवडणुकीत एनडीएला ३०३ जागा मिळाल्या, ज्यात भाजपने १८३ जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष म्हणून आपली स्थिती बळकट केली.
२००४ मध्ये वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने “इंडिया शायनिंग” हे अभियान राबवले, पण ते प्रभावी ठरले नाही. या निवडणुकीत भाजपला १८६ जागा मिळाल्या, तर काँग्रेसने २२२ जागा जिंकून आघाडी घेतली. पुढे २००९ मध्ये पक्षाच्या जागा घटून ११६ वर आल्या.
२०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपने मोठा विजय मिळवला. पक्षाने २८२ जागा जिंकल्या आणि एनडीएने मिळून एकूण ३३६ जागांवर यश मिळवले. २६ मे २०१४ रोजी नरेंद्र मोदी भारताचे १५ वे पंतप्रधान झाले. १९८४ नंतर प्रथमच कोणत्याही पक्षाला लोकसभेत एकहाती बहुमत मिळाले होते. या यशानंतर, २०१९ च्या निवडणुकीत भाजपने आणखी एक पाऊल पुढे टाकत ३०३ जागांवर विजय मिळवून ऐतिहासिक घवघवीत यश प्राप्त केले.