चंद्रशेखर आजाद आणि भाजप नेत्याच्या गुप्त बैठका, रोहिणी घावरीच्या दाव्याने खळबळ
स्वित्झर्लंडमध्ये राहत असलेल्या आणि बहुजन चळवळीत सक्रीय असलेल्या रोहिणी घावरी यांनी एक धक्कादायक दावा करत भीम आर्मीचे प्रमुख आणि खासदार चंद्रशेखर आझाद यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. चंद्रशेखर आझाद भाजप नेत्यांशी गुपचूप भेटत होते आणि याच गुप्त बैठकांना त्यांनी अनेकदा विरोध केला होता. मात्र त्यासाठी त्यांना ‘विषकन्या’, ‘भाजप एजंट’ आणि ‘चरित्रहीन’ अशा टीकेला सामोरं जावं लागलं होतं, असा दावा त्यांना एका यूट्यूबर दिलेल्या मुलाखतीत केला आहे.
चंद्रशेखर यांनी लग्नाचं आमिष दाखवून चार वर्षे त्यांचा मानसिक आणि वैयक्तिक पातळीवर गैरफायदा घेतला. मात्र एकदा खासदार बनल्यानंतर त्यांनी मागे वळून कधी पाहिलं नाही. या नात्याशी संबंधित अनेक व्हिडिओ कॉल्स, खाजगी संवाद, एकत्र घालवलेले क्षण आणि राजकीय चर्चा याचे पुरावे त्यांच्याकडे असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
“जून २०२१ मध्ये सफाई कामगारांच्या आंदोलनादरम्यान आमची भेट झाली होती. मनीषा वाल्मिकी हत्याकांडामुळे चंद्रशेखर बहुजन समाजात एक मोठं नाव बनले होते. त्यानंतर आमच्या संवादाची सुरुवात झाली आणि हळूहळू जवळीक वाढली. मी त्यांना आधी ‘भाऊ’ म्हणत होते, पण पुढे त्यांच्याकडूनच पुढाकार घेतला गेला.”
त्यानंतर त्यांनी स्पष्ट केलं की, “मी कधीही राजकीय पदाची अपेक्षा केली नव्हती. फक्त त्यांच्या चळवळीचा भाग बनून समाजासाठी काही करण्याची माझी इच्छा होती. मात्र त्यांनी माझा विश्वासघात केला. त्यांनी त्यांच्या आईशी माझी ओळख करून दिली, लग्नाचे आश्वासन दिले आणि त्या बहाण्याने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. चार वर्षांच्या नात्यानंतर त्यांनी मला पूर्णपणे दूर लोटले.”
रोहिणी पुढे म्हणाल्या की, “२०२२ मध्ये जेव्हा त्यांनी योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात गोरखपूरमधून निवडणूक लढवली तेव्हा त्यांच्या नामनिर्देशनाच्या शपथपत्रातून त्यांच्या वैवाहिक स्थितीची माहिती समोर आली. मी त्यांच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी ‘निवडणूक तोंडावर आहे’ असे सांगून मला थांबवलं.”
या नात्यामुळे त्या मानसिक तणावात गेल्या आणि त्यांनी दोन वेळा आत्महत्येचाही विचार केला, अशी धक्कादायक कबुली त्यांनी दिली. रोहिणी म्हणाल्या की, “जर मी खरोखर भाजपची एजंट असते, तर मला कोणी पाठवलं होतं, त्याचे पुरावे दाखवा. मी गप्प बसेन आणि स्वित्झर्लंडमध्ये गुमनाम जीवन जगायला तयार आहे. पण माझी बदनामी करण्यात आली.” “२०२४ मध्ये चंद्रशेखर इटली आणि ऑस्ट्रियामध्ये आले होते. मी त्यांना म्हटलं होतं की हे बरोबर नाही. जर मी लालची असते, तर २०२२ मध्येच त्यांना सोडून दिलं असतं, जेव्हा ते निवडणूक हरले होते. चंद्रशेखर आजाद आणि भाजपमधील संबंधांविषयी मी अनेकदा विरोध केला होता, पण त्यांनी मला समजून न घेता म्हटलं की, मला राजकारण समजत नाही. जेव्हा मी प्रश्न विचारले, तेव्हा ते माझ्यापासून अनेक गोष्टी लपवू लागले,” असा आरोप त्यांनी केला.
“मी ‘जन आवाज फाउंडेशन’ या संस्थेच्या माध्यमातून समाजसेवा करत आहे. मला राजकारण नको आहे, फक्त समाजासाठी काही करायचं आहे. मात्र आज मला ‘चरित्रहीन’ ठरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे. पण आता मी माझ्या स्वाभिमानासाठी लढणार आहे,” असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला.या प्रकरणामुळे चंद्रशेखर आजाद यांच्यावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, त्यांच्या भाजपशी असलेल्या कथित संबंधांबाबतही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. रोहिणी घावरी यांनी केलेल्या या आरोपांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.