
bjp chandrashekhar bawankule reaction on ajit pawar pcmc bjp corruption local body elections
Chandrashekhar Bawankule : पुणे : राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. एकूण 29 महापालिकांसाठी निवडणूका जाहीर झाल्या असून जोरदार प्रचार सुरु आहे. येत्या 15 जानेवारी रोजी मतदान आणि 16 जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. दरम्यान, पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादीची युती झाली आहे. यामुळे महायुतीमधील वाद समोर येत आहे. भाजप आणि अजित पवार गटामध्ये अंतर्गत वाद सुरु झाला आहे. अजित पवारांनी भाजप नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी चिंचवडमध्ये प्रचार केला. यावेळी त्यांनी पिंपरी चिंचवडमधील भाजप नेत्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले. अजित पवार म्हणाले की, “पिंपरी चिंचवड पालिकेच्या कारभारामध्ये पारदर्शकतेचा पूर्णपणे अभाव आहे. राज्यातील कोणाचाही वचक राहिला नाही. त्यामुळे PCMC शहरामध्ये लुटालुट करणारी गॅंग तयार झाली आहे. म्हणून या भ्रष्टाचारी राक्षसांचं दहन करण्यासाठी आम्ही निवडणुकीच्या मैदानात उतरलो आहे. भाजपची राक्षसी भूक पहावत नाही. माझ्याकडे भ्रष्टाचाराचे पुरावे आहेत. येथे मोठ्या प्रमाणात हप्तेखोरी सुरु आहे,” असा गौप्यस्फोट करत अजित पवार यांनी वादाची ठिणगी पेटवली.
हे देखील वाचा : महायुतीमध्ये आली नामुष्की? अजित पवारांची पोलखोल अन् रवींद्र चव्हाणांचा पलटवार
यावर भाजप नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी अजित पवारांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, आम्ही असे ठरवले आहे की, अजित पवार आणि एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी असं ठरवलं आहे की, मित्र पक्षात निवडणूक लढवताना मनभेद आणि मतभेद होणार नाही याची काळजी तिन्ही पक्षांनी घ्यायची आहे, अजित पवार असे का बोलले ते मला माहित नाही, त्यांनी बोलायला नको होतं, अशा शब्दांत बावनकुळे यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.
मित्र पक्षात मनभेद मतभेद नको
पुढे ते म्हणाले की, “आम्ही समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी ठरवलं आहे की, मित्र पक्षात विरोधात जरी लढलो तरी महायुतीत कुठलेही मनभेद मतभेद होणार नाही सर्वांनी घ्यायची आहे. मुख्यमंत्र्यांनी आतापर्यंतच्या भाषणात कुठल्याही पक्षावर कुठल्याही नेत्यांवर टीका केली नाही. त्यामुळे अजित पवार आणि सर्वांना विनंती राहील, की मित्र पक्षात मनभेद मतभेद करू नये एवढी विनंती आहे. मित्र पक्षात मोठ्या भावाच्या रूपात आहोत त्यामुळे कुठली उत्तर देणे टीका-टिप्पनी करणार नाही,” असे स्पष्ट मत चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले आहे.
हे देखील वाचा : रिलस्टार अथर्व सुदामेच्या अडचणीमध्ये पुन्हा वाढ! ‘त्या’ रिलवरुन PMPML ची थेट नोटीस
शेतकरी स्टॅम्प ड्युटी माफीबद्दल बोलताना बावनकुळे यांनी म्हटले की, “शेतकरी जेव्हा पीक कर्ज घेतो, आता दोन लक्ष रुपयापर्यंत स्टॅम्प ड्युटी लागणार नाही, हा ऐतिहासिक निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महसूल खात्याने घेतलेला आहे, ज्यामुळे जे शेतकरी आता पीक कर्ज घेतील, दोन लाखापर्यंत पीक कर्ज घेतील त्यांना आता स्टॅम्प ड्युटी लागणार नाही,” अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.