SC चा उमेदवार अन् खुल्या प्रवर्गातील मतदारसंघ, चिराग पासवान यांचा नवा प्रयोग इतिहास घडवणार की विरोधकांना तारणार?
लोक जनशक्ती पक्ष (रामविलास) प्रमुख आणि केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी बिहारच्या आऱामधील एका सभेत विधानसभेची निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे. विशेष म्हणजे, ते अनुसूचित जातींसाठी राखीव नसलेल्या म्हणजेच खुल्या प्रवर्गातील जागेवरून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. ही गोष्ट केवळ त्यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षेचीच नव्हे तर दलित नेतृत्वाच्या सामाजिक व्याप्तीच्या विस्ताराचीही नोंद घेणारी आहे. मात्र, आतापर्यंतच्या निवडणूक डेटावर नजर टाकली तर सामान्य जागांवरून दलित आणि आदिवासी उमेदवारांना फारसं यश मिळालेला नाही. त्यामुळे पासवान यांच्या निर्णयाने एक नवा राजकीय प्रयोग होणार आहे का, याकडे लक्ष लागले आहे.
चिराग पासवान यांनी फक्त लोकसभा निवडणुका लढवली आहेत. त्यांनी 2014 आणि 2019 मध्ये जमुई लोकसभा मतदारसंघातून, आणि 2024 मध्ये हाजीपूरमधून विजय मिळवला. मात्र, आता ते पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत आणि ती सुद्धा सामान्य जागेवरून.
ते म्हणाले, “माझ्या निवडणुकीमुळे आमच्या पक्षाचा स्ट्राइक रेट सुधारेल, ज्याचा फायदा NDA ला होईल.” ही निवडणूक त्यांची मुख्यमंत्रीपदाच्या दिशेने वाटचाल मानली जात आहे. सामान्य जागांवर विजय मिळवण्याचा दलित-आदिवासी उमेदवारांचा इतिहास फारसा चांगला राहिलेला नाही.
2004 पासून निवडणूक आयोगाने उमेदवारांचे जातीय विवरण नोंदवायला सुरुवात केली. त्यानंतरच्या 20 वर्षांत केवळ 62 अनुसूचित जाती-जमाती (SC/ST) उमेदवारच लोकसभा निवडणुकीतील सामान्य जागांवरून निवडून आले आहेत. ही संख्या केवळ एक टक्क्यापेक्षा थोडी जास्त आहे. त्यापैकी फक्त 15 जण SC प्रवर्गातील असून उर्वरित 47 जण ST समुदायातील आहेत. हे असूनही, सामान्य जागांवरून निवडणूक लढवणारे SC उमेदवार ST उमेदवारांपेक्षा 6 पट अधिक आहेत (5,063 SC विरुद्ध 890 ST). बिहारसारख्या राज्यात गेल्या 20 वर्षांत एकाही SC/ST उमेदवाराने लोकसभेच्या सर्वसामान्य जागेवर विजय मिळवलेला नाही.
2004 पासून झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये 20,644 SC/ST उमेदवारांनी सामान्य जागांवरून निवडणूक लढवली होती. त्यात फक्त 246 उमेदवार निवडून आले (1.19%). त्यातही फक्त 64 जण SC समुदायातून तर 182 ST समुदायातून होते. बिहारसारख्या राज्यात अनुसूचित जाती-जनजातीचे मोठ्या प्रमाणात लोकसंख्येचे प्रतिनिधित्व असूनही, सामान्य जागांवर मिळणारं यश अत्यल्प आहे.
BSP ने सर्वाधिक 600 SC/ST उमेदवार सामान्य जागांवरून लोकसभा निवडणुकीसाठी उतरवले, मात्र विजय कमीच.
भाजपने 54 उमेदवार दिले आणि त्यात 28 जिंकले.
काँग्रेसने 52 उमेदवार दिले असून त्यात फक्त 15 विजय मिळाले.
LJP आणि LJP (रामविलास) यांच्याकडूनही 239 उमेदवार सामान्य जागांवर उतरले — मात्र एकाही उमेदवाराला यश नाही.
किरण रिजिजू, अरुणाचल प्रदेश – 4 वेळा विजय
सरबानंद सोनोवाल, आसाम – 3 वेळा विजय
माजेंद्र नारझारी, आसाम – 4 वेळा विधानसभा विजय (Gossaigaon)
प्रेम सिंग तमांग, सिक्कीम – 3 वेळा विधानसभा विजय
अवधेश प्रसाद, समाजवादी पक्ष, 2024 मध्ये अयोध्या (Faizabad) वरून सामान्य जागेवरून विजय
चिराग पासवान यांचा सामान्य जागेवरून निवडणूक लढवण्याचा निर्णय हा केवळ निवडणूक रणनीती नव्हे तर सामाजिक प्रतिनिधित्वाच्या मर्यादा ओलांडण्याचा प्रयत्नही मानला जाऊ शकतो. मात्र, मागील आकडेवारी पाहता हा निर्णय मोठा धोका असू शकतो. त्यांनी जर ही लढत जिंकली, तर तो एक ऐतिहासिक अपवाद ठरेल आणि दलित नेतृत्वाच्या सत्ताकेंद्राच्या दिशेने वाटचालीचा नवा अध्यायही लिहिला जाऊ शकतो.