CM Omar Abdullah demands bunker for every house in Jammu and Kashmir for security
श्रीनगर : पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर जम्मू काश्मीरमधील सीमा भागातील सुरक्षेचा प्रश्न समोर आला आहे. दहशतवाद्यांनी केलेल्या या हल्ल्यामध्ये 26 पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यामुळे जम्मू काश्मीरमधील सुरक्षा वाढवून पुन्हा एकदा बंकर देण्याची मागणी जोर धरत आहे. काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी पाकिस्तानी गोळीबारामुळे प्रभावित झालेल्या भागांना भेट दिली. यावेळी नागरिकांनी त्यांच्या समस्या मांडल्या आहेत.
भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावपूर्ण युद्ध परिस्थिती निर्माण झाली होती. भारतीय सैन्याने पाकिस्तानचे सर्व हल्ले परतवून लावले असून पाकिस्तानला चांगली अद्दल घडवली आहे. मात्र पाकिस्तानने भारताच्या सीमा भागातील राज्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये राजस्थान, पंजाब आणि जम्मू काश्मीरमध्ये जनजीवन थांबले होते. तसेच पाकिस्तानकडून झालेल्या अनेक गोळीबारांमुळे जीवित आणि मालमत्तेचे तसेच पायाभूत सुविधांचे नुकसान झाले आहे. यामुळे या भागातील रहिवाश्यांनी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्याकडे त्यांचे प्रश्न मांडले आहेत. यावेळी सुरक्षेसाठी बंकरची आवश्यकता असल्याचे सांगितले आहे. गेल्या काही वर्षांपासून सीमेवर शांतता राखल्यामुळे बंकरची संख्या कमी झाली होती.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
स्थानिक रहिवाशांच्या मागण्यांनुसार त्यांना वैयक्तिक बंकर पुरवण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेवर मुख्यमंत्री अब्दुल्ला यांनी भर दिला आहे. त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, “पुन्हा एकदा बंकर चर्चेचा विषय बनले आहेत. अनेक वर्षांपासून आम्हाला बंकरची गरज नव्हती. आता लोकांनी वैयक्तिक बंकरची मागणी केली आहे, सामुदायिक बंकरची नाही. आम्ही गोळीबारामुळे प्रभावित झालेल्या सर्व भागात बंकरची व्यवस्था करू,” असे मत जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुला यांनी व्यक्त केले आहे.
जम्मू आणि काश्मीरच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, “उरी, तंगधार, राजौरी आणि पूंछ येथे गोळीबारानंतरची परिस्थिती सारखीच आहे. गोळीबारामुळे झालेल्या नुकसानाचे मूल्यांकन केले जाईल आणि लोकांना भरपाई दिली जाईल.” असे आश्वासन देखील मुख्यमंत्री ओमर अब्दुला यांनी दिले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
ओमर अब्दुल्ला पुढे म्हणाले की, “आमच्या नागरी भागांवर दोन ते तीन दिवस हल्ले होत राहिले. असे वाटत होते की जास्तीत जास्त नागरी मालमत्तेचे नुकसान करण्याचा प्रयत्न केला गेला होता. सध्या युद्धबंदी लागू आहे आणि सध्या सीमावर्ती भागात शांतता आहे. आम्ही सर्व बाधित भागांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही झालेल्या सर्व नुकसानाचे मूल्यांकन करत आहोत आणि त्या आधारे, आम्ही लोकांना भरपाई देऊ,” असे मत जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुला यांनी व्यक्त केले आहे.