
kapil sibbal
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या भाषणाच्या धन्यवाद प्रस्तावावर झालेल्या चर्चेला राज्यसभेत प्रत्युत्तर देत काँग्रेससह (Congress) गांधी कुटुंबावर (Gandhi Family) हल्ला चढवला. यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल (Kapil Sibbal) यांनी या हल्ल्याला प्रत्युत्तर दिलंय. मोदींनी ज्या रेल्वे स्टेशनवर चहा विकला ते रेल्वे स्टेशन काँग्रेसनेच बांधलं होतं, असं म्हणत सिब्बल यांनी मोदींवर निशाणा साधला.
कपिल सिब्बल म्हणाले, गोवा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाबमध्ये निवडणूक होत आहे. त्यामुळे मोदींनी निवडणुकीच्या मैदानातील भाषण केलं. मला देखील मोदींना इतिहास समजाऊन सांगायचा आहे. मोदी ज्या रेल्वे स्टेशनवर चहा विकत होते ते रेल्वे स्टेशन काँग्रेसने तयार केलं होतं. जर काँग्रेसने ते रेल्वे स्टेशनच तयार केलं नसतं तर मोदींनी चहा कसा विकला असता.
आयआयटी आणि आयआयएम या संस्था मोदींनी नाही, तर काँग्रेसने निर्माण केल्या होत्या, असंही सिब्बल यांनी म्हटलं.
लता मंगेशकरांच्या निधनानं देश दुःखी झाला आहे. लता मंगेशकर यांचं कुटुंब हे गोव्यातील आहे. पण त्यांच्या कुटुंबासोबत कशाप्रकारे अन्याय केला हेदेखील देशाला समजलं पाहिजे. लता मंगेशकर यांचे छोटे भाऊ पंडीत हृदयनाथ मंगेशकर यांना ऑल इंडियो रेडिओच्या नोकरीवरून काढून टाकण्यात आलं. हृदयनाथ मंगेशकर यांनी वीर सावकरांची देशभक्तीवर कविता रेडिओवर प्रस्तुत केली म्हणून त्यांना काढून टाकण्यात आलं होतं. हृदयनाथ मंगेशकर यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं, असं नरेंद्र मोदींनी यावेळी सांगितलं.
जेव्हा ते सावरकरांना भेटले तेव्हा कवितेला चाल लावण्याबद्दल सांगितलं होतं. त्यावर सावरकरांनी हृदयनाथ यांना माझी कविता सादर करुन जेलमध्ये जायचंय का? अशी विचारणा केली होती. यानंतर हृदयनाथ यांनी त्यांच्या देशभक्तीपर कवितेला संगीतबद्ध केलं होतं. त्यानंतर आठ दिवसांच्या आत हृदयनाथ मंगेशकर यांना नोकरीवरुन काढून टाकण्यात आलं होतं. हे तुमचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. स्वांतंत्र्याच्या या खोट्या गोष्टी तुम्ही देशासमोर ठेवल्या आहेत, अशी टीका नरेंद्र मोदींनी यावेळी केली.
भारत स्वतंत्र झाल्यानंतर १५ वर्षांनी गोवा मुक्त झाला. सरदार वल्लभाई पटेल यांनी हैद्राबाद, जुनागढसाठी रणनिती बनवली, पावले उचचलली, तशी प्रेरणा घेत गोव्यासाठी रणनिती बनवली असती तर गोव्याला १५ वर्षे गुलामीत रहावं लागलं नसतं, अशी टीका त्यांनी काँग्रेसवर आणि तत्कालीन धोरणांवर केली.