Congress MP Priyanka Gandhi's Parliament speech targets Modi government over Pahalgam attack
Priyanka Gandhi Parliament speech : नवी दिल्ली : सध्या संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. यामध्ये ऑपरेशन सिंदूर आणि पहलगाम हल्ल्यावरुन जोरदार चर्चा सुरु आहे. पहलगाम हल्ल्यावरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरले असून वादंग निर्माण झाला आहे. यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेमध्ये पाकिस्तानच्या नापाक हालचाली आणि विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. यानंतर कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी संसदेमध्ये भाषण केले. प्रियांका गांधी यांनी आपल्या भाषणामध्ये सत्ताधारी भाजपवर गंभीर आरोप केला आहे.
खासदार प्रियांका गांधी या संसदेमध्ये कडाडल्या आहेत. खासदार प्रियांका गांधी म्हणाल्या की, “भारतीय सैन्य हे कडाक्या थंडीमध्ये देखील सीमेवर देशाचे रक्षण करत असतात त्यांच्या कार्याला माझा सलाम आहे. देशासाठी बलिदान देण्यासाठी सैनिक नेहमी तप्तर असतात. ज्या दिवशी 22 एप्रिल रोजी पहलगाम हल्ला झाला तर तो का झाला हे सांगण्यात आलं नाही. हे लोक काश्मीरमध्ये करत काय होते? सरकार काश्मीरमध्ये दहशतवाद संपला आहे असा प्रचार करत होते. काश्मीरमध्ये शांतता आहे असं सांगण्यात येत होतं तर असा हल्ला झाला कसा?” असा सवाल प्रियांका गांधी यांनी उपस्थित केला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे त्या म्हणाल्या की, “पहलगाम हल्ल्यामध्ये कोणला पत्नीसमोर तर कोणाला बहिणीसमोर मारुन टाकण्यात आले. 26 लोकांवर गोळीबार करण्यात आला. एक तास भारतीयांना निवडून मारत असताना यावेळी एकही सुरक्षा रक्षक याठिकाणी आला नाही. त्या ठिकाणी सुरक्षा का नव्हती? तिथेही एकही सैनिकाची नियुक्ती का नव्हती? सरकारला माहिती नव्हते का की याठिकाणी रोज 1500 हून अधिक पर्यटक येत असतात. तिथे डॉक्टर, सुरक्षा, फर्स्ट एड कशाचीच सुविधा नव्हती. पर्यटक लोक सरकारच्या भरवश्यावर त्या ठिकाणी फिरण्यासाठी गेले होते. मात्र सरकारने त्या लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडले होते,” असा घणाघात खासदार प्रियांका गांधी यांनी केला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
हे पंतप्रधानांच्या गैर जबाबदाराचे सर्वात मोठे प्रतिक
पुढे खासदार प्रियांका गांधी म्हणाल्या की, “गृहमंत्रालयाने या हल्ल्याची जबाबदारी घ्यावी. या देशावर हल्ला झाला तर संसदेमध्ये असणारा प्रत्येक व्यक्ती सरकारच्या पाठीशी उभा असेल. आणि यावेळी देखील आम्हाला सैन्यावर अभिमान आहे की त्यांनी शौर्याने लढाई लढली. आपलं सैन्य सीमेवर लढलं आणि श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदींना घ्यायचं आहे. सैनिकांच्या लढ्याचे आणि ऑलिंपिकच्या मेडलचे देखील पंतप्रधान श्रेय घेतात. नेतृत्व हे फक्त श्रेय घेऊन नाही तर जबाबदारी घेऊन होत असते. देशाच्या इतिहासामध्ये हे पहिल्यांदा झाले की लढाई होता होता अचानक थांबली. ही लढाई थांबवण्याची घोषणा सरकार किंवा सैन्य करत नाही तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष करत आहेत. हे आपल्या पंतप्रधानांच्या गैर जबाबदाराचे सर्वात मोठे प्रतिक आहे,” अशा खडक शब्दांत प्रियांका गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.