कोल्हापूर नांदणी जैन मठातील महाराणी हत्तीणीला अंबानींच्या वनतारामध्ये पाठवण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश दिले (फोटो - सोशल मीडिया)
Kolhapur Maharani Elephant in Vantara : कोल्हापूर : सध्या राज्यामध्ये एका हत्तीची जोरदार चर्चा सुरु आहे. ती म्हणजे कोल्हापूरची महादेवी हत्ती. कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यामध्ये असणाऱ्या नांदणी गावामध्ये ही महादेवी हत्तीण होती. मागील 40 वर्षांपासून ही हत्तीण जैन समाजाच्या मंदिरामध्ये आनंदाने राहत होती. मंदिरामध्ये वास्तव्य करणाऱ्या महादेवी उर्फ माधुरी हिला मंदिरातील पुजाऱ्यांनी, भाविकांनी आणि गावकऱ्यांनी जीव लावला होता. ती फक्त एक प्राणी म्हणून नाही तर मंदिराच्या आवारातील एक महत्त्वाचा घटक म्हणून मंदिराच्या आवारामध्ये राहत होती. मात्र कायद्याच्या चौकटीमध्ये भावनांना अखेर हार मानावी लागली. कोर्टाच्या निकालानंतर कोल्हापूरच्या महादेवी हत्तीणीची रवानगी गुजरातच्या वनतारामध्ये करण्यात आली आहे.
नांदणी गावात स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठ आहे. हा मठ महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरील जैन समाजाच्या 748 गावांचा केंद्रबिंदू आहे. शेकडो वर्षांचा इतिहास असलेला हा मठ सध्या जोरदार चर्चेमध्ये आला आहे. याच मठात गेल्या अनेक दशकांपासून धार्मिक श्रद्धेने आणि परंपरेनुसार हत्ती पाळण्याची प्रथा आहे. महादेवी हत्तीण या परंपरेनुसार मठामध्ये वास्तव्यास होती. मागील जवळपास 35 ते 40 वर्षांपासून ही हत्तीण मठात राहत होती. मठाचे मठाधिपती प. पू. स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांनी तिला मुलाप्रमाणे जीव लावला. तिची काळजी घेतली. गावातील सर्व लोकांसाठी देखील ती एक काळजाचा तुकडा बनली बनली होती.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
कोल्हापूरातील या महादेवी हत्तीणीवरुन मात्र कोर्टामध्ये जोरदार वादंग निर्माण झाला. अंबानींच्या वनतारा हत्ती संवर्धन समुहाने या मठातील हत्तीणीच्या राहण्यावर आक्षेप घेतला. हत्ती वनतारामध्ये पाठवण्याचे वनतारा कडून सांगण्यात आले. मात्र मठाने स्पष्ट शब्दांमध्ये नकार दिला. याचे कारण महादेवी हत्तीण ही केवळ प्राणी नाही तर मंदिराचा एक अविभाज्य घटक होती. मात्र वनतारा ट्रस्टने पेटाच्या सहाय्याने मठाच्या विरोधात कायदेशीर कारवाई सुरु केली. मठावर वनविभागाची परवानगी न घेता महादेवीला मिरवणुकीत सहभागी केल्याचा आरोप केला. याच आधारावर मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली आणि उच्च न्यायालयाने महादेवीला वनतारा केंद्रात पाठवण्याचा आदेश दिला. हा निर्णय मठाने मान्य केला नाही. हाय कोर्टाच्या निर्णयाला मठाने सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान दिले.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. गावकन्यांनीही या निर्णयाविरोधात विराट मुक मोर्चा काढला, निषेध व्यक्त केला. पण २८ जुलै २०२५ रोजी सर्वोच्च न्यायालयाने मठाची याचिका फेटाळून मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. हा निकाल गावकऱ्यांसाठी आणि मठासाठी धक्कादायक होता. माजी खासदार राजू शेट्टी यांनी या निर्णयाला ‘एका बड्या उद्योगपतीच्या बालहट्टाला समाजाच्या भावनांवर कुरघोडी असे संबोधले. महादेवी हत्तीणला नांदणी गावातून साश्रू डोळ्यांनी निरोप देण्यात आला. यावेळी मठातील पुजाऱ्यांचा अश्रूंचा अक्षरशः बांध फुटला. सोशल मीडियावर याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे महादेवी हत्तीणीला देखील वर्षानुवर्षे असलेली मठाची साथ सोडताना अश्रू अनावर झाले. महादेवी हत्तीणीच्या डोळ्यातून देखील पाणी येत होते.