Death
रायबरेली : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) सातही टप्प्यातील मतदान शनिवारी (दि.1) पूर्ण झाले. उत्तर प्रदेशातील रायबरेली मतदारसंघातून काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) निवडणूक लढवत आहेत. येथे मतदान पार पडल्यानंतर ईव्हीएम मशीन स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यात आल्या. याचदरम्यान कर्तव्यावर असलेल्या एका पोलिस निरीक्षकाचा मृत्यू झाला.
हरिशंकर असे या पोलिस निरीक्षकाचे नाव आहे. रायबरेलीतील स्ट्राँग रूममध्ये कर्तव्य बजावत असलेले हरिशंकर यांना प्रचंड उष्णतेमुळे हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर जिल्हा रुग्णालयात नेत असताना त्यांचा मृत्यू झाला. शहरातील गोरा बाजार येथील आयटीआयमध्ये स्ट्राँग रूम करण्यात आली आहे. निवडणुकीच्या कामात सहभागी 7 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून, उत्तर प्रदेश सरकारने त्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 कोटी रुपयांची भरपाई जाहीर करावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि सपाचे नेते अखिलेश यादव यांनी केली आहे.
अखिलेश यादव म्हणाले की, मिर्झापूरमधील मतदान कामातील 7 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला ज्यांची कुटुंबे उद्धवस्त झाली आहेत, त्यांना भावनिक दिलासा देण्यासाठी सरकारने पुढे यावे. 5 होमगार्ड, 1 सीएमओ कार्यालयातील लिपिक आणि 1 सफाई कामगार यांच्या कुटुंबीयांसाठी सरकारने तात्काळ प्रत्येकी 5 कोटी रुपयांची भरपाई जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी केली.