नवी दिल्ली: दिल्लीत मतदानाच्या तोंडावर आम आदमी पक्षाला मोठा झटका लागला आहे. दोन दिवसांपूर्वीच आपच्या आठ आमदारांनी आपला सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर आज या सर्व आठही आमदारांना भाजपमध्ये प्रवेश केल्याची माहिती समोर आली आहे. भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बैजयंत पांडा आणि दिल्ली भाजप अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांच्या उपस्थितीत हे ८ आमदार आणि नगरसेवक अजय राय यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपसाठी ही आनंदाची बातमी असली तरी आम आदमी पक्षासाठी हा मोठा झटकाच मानला जात आहे. या प्रसंगी भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बैजयंत पांडा यांनी सांगितले की, “आजचा दिवस ऐतिहासिक आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या काही दिवस आधीच एवढ्या मोठ्या संख्येने नेत्यांनी ‘आप’मधून बाहेर पडून नवा मार्ग स्वीकारला आहे.”
आम आदमी पक्षाचा राजीनामा देणाऱ्या आमदारांची नावे:
जनकपुरीचे आमदार राजेश ऋषी, महरौलीचे आमदार नरेश यादव, पालमच्या आमदार भावना गौड, त्रिलोकपुरीचे आमदार रोहित महरौलिया, बिजवासनचे आमदार बी. एस. जून, कस्तुरबा नगरचे आमदार मदनलाल, आदर्श नगरचे आमदार पवन शर्मा आणि मादीपूरचे आमदार गिरीश सोनी यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. या सर्व आमदारांनी आम आदमी पक्षावर भ्रष्टाचाराचे आरोप करत पक्षाचा राजीनामा दिला होता. शनिवारी त्यांनी अधिकृतरित्या भाजपमध्ये प्रवेश केला.
पीटीआयच्या अहवालानुसार, हे आमदार पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडून दुर्लक्ष केल्याने नाराज होते. ते अनेक वर्षे प्रामाणिकपणे काम करत होते, पण त्यांना योग्य तो मान मिळत नव्हता. पालमच्या आमदार भावना गौड, जे दोन वेळा आमदार राहिले आहेत, म्हणाले, “मी आम आदमी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे कारण माझा पक्ष आणि अरविंद केजरीवाल यांच्यावरचा विश्वास उडाला आहे.”
या राजीनाम्यांवर प्रतिक्रिया देताना आम आदमी पक्षाने एका सर्वेक्षणाचा हवाला दिला. पक्षाच्या म्हणण्यानुसार, हे आमदार त्यांच्या मतदारसंघात जनतेसाठी उपलब्ध नव्हते, त्यामुळे त्यांना निवडणुकीसाठी उमेदवारी दिली गेली नाही. आमदारांचा दुसऱ्या पक्षात जाणे हे राजकारणाचा भाग असल्याचेही पक्षाने स्पष्ट केले.
MPSC पेपर विक्री प्रकरणात मोठी अपडेट; तिघांना अटक, मध्यप्रदेश कनेक्शनही उघड
दिल्ली निवडणुकीत सत्ताधारी आम आदमी पक्षाने 16 आमदारांचे तिकीट कापत नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. त्यापैकी 8 आमदारांनी एकत्र पक्षाचा राजीनामा दिला आहे. उर्वरित आमदारांचा पुढील निर्णय काय असेल, यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. दिल्ली निवडणुकीला अवघे चार दिवस बाकी असताना भाजपने या आमदारांना पक्षात सामील करून मोठे राजकीय पाऊल उचलल्याचे मानले जात आहे.