'त्यांच्या डोक्यात दारूचं दुकान अन्...'; केजरीवालांच्या पराभवानंतर अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया
दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपचा दारूण पराभव होताना दिसत असून २७ वर्षांनंतर दिल्लीची सूत्र भाजपच्या हातात जाताना दिसत आहेत. भाजपला सर्वात मोठा धक्का अरविंद केजरीवाल यांच्या पराभवाने बसला आहे. दरम्यान ज्यांच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनातून आम आदमी पक्षाचा उदय झाला त्या अण्णा हजारेंनी यावर तिखट प्रतिक्रिया दिली आहे.
अरविंद केजरीवाल यांना मद्य धोरण भोवलं. त्यांच्या डोक्यात दारू, दारूची दुकाने शिरली त्याचवेळी त्यांचा पराभव झाला होता अशी गंभीर टीका त्यांनी केली आहे.
अण्णा हजारे म्हणाले, “मी आधीच सांगितलंय की, निवडणूक लढताना उमेदवारामध्ये आचरण, विचार शुद्ध असणे, जीवन निष्कलंक असणे, जीवनात त्याग असणे हे गुण जर असतील तर मतदारांना विश्वास वाटतो की आपल्यासाठी कोणीतरी करणारा आहे. वेळोवेळी सांगत आलो पण त्यांच्या डोक्यात ते आलं नाही.”
“दारूच्या बाबतीत त्यांनी एक मुद्दा उपस्थित केला…की दारूचे दुकान, हा दारूचा मुद्दा का उपस्थित झाला तर पैसा आणि संपत्ती, यामध्ये ते वाहून गेले. आपला झटका बसला कार, त्यांना दारूचं दुकान काढायचं होतं, दारूचे परमीट द्यायचे हा विचार जेव्हा यांच्या डोक्यात शिरला त्यावेळेला हे डाऊन झाले. जागरूक मतदार लोकशाहीचा आधार आहेत आणि आजचा मतदार जागरूक आहे. त्याने पाहिलं की हे सगळा दारूचा विचार करतात, त्यामुळे त्याने नकार दिला”
“जेव्हा माझ्याबरोबर आले त्यावेळेला मी त्यांना सुरूवातीपासून सांगत आलो की जनतेचे सेवा करा. सेवेता अर्थ निष्काम कर्म, फळाची अपेक्षा न करता केलेलं कर्म ही ईश्वराची पूजा असते, अशी पूजा तुम्ही करत रहा तुम्हाला कोणी हटवणार नाही. सुरुवातीला बरं वाटलं, मात्र नंतर यांच्या डोक्यात दारूचं दुकान शिरलं. दारूचे लायसन्स शिरले आणि पुढे यात घोटाळाही झाला. दारू डोळ्यासमोर आली की पैसा , धन, दौलत आली, मग सगळं बिघडत आणि त्यामुळेच जनतेने त्यांना जो कौल दिला तो बरोबर दिला की असं वागत असलेले लोक सत्तेवर आले तर देश, दिल्ली बरबाद होईल म्हणून त्यांना मतदारांनी पुन्हा सत्ता देण्यास नकार दिला.