दिल्लीचा निकाल कोणाच्या पथ्थ्यावर पडणार? देशाच्या राजकारणावर काय परिणाम होणार? वाचा सविस्तर
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालाआधी एक्झिट पोलच्या निकालांनी संपूर्ण देशाला आश्चर्याचा धक्का दिला आहे. या अंदाजांनी गेली १० वर्ष सत्तेत असलेल्या आणि केंद्र सरकारच्या नाकीनऊ आणलेल्या अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाचं टेन्शन वाढलं आहे. शिवाय कॉंग्रेसची प्रतिष्ठाही पणाला लागली आहे. जर एक्झिट पोलचे अंदाज खरे ठरले आणि अरविंद केजरीवाल यांच्या हातातून दिल्ली भाजपकडे गेली तर त्याचे दिल्लीच्या राजकारणात कोणते परिणाम होतील. देशात काय संदेश जाईल आणि येणाऱ्या निवडणुकांवरही त्याचा काय परिणाम होईल जाणून घेऊया….
दिल्लीत एक्झिट पोलचे अंदाज प्रत्येक वेळी खरे ठरले नाहीत. पण यावेळी जर दिल्लीतील एक्झिट पोलचे निकाल खरे ठरले तर भाजप जवळजवळ २७ वर्षांनी पुन्हा सत्तेत येईल. आम आदमी पक्षाचा पराभव झाला तर तो पक्षाचा सर्वात मोठा पराभव ठरेल कारण इथूनच राजकीय प्रवास सुरू केलेल्या आम आदमी पक्षाने पंजाबमध्ये पूर्ण बहुमताचे सरकार स्थापन करून राष्ट्रीय पक्ष होण्याचा मान मिळवला आहे.
आम आदमी पक्षाची पतिष्ठा मलीन झाली ती मद्य धोरणातील कथीच घोटाळ्यात. आरोप सिद्ध झाले नसले तरी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना तुरुंगात जावं लागलं. अनेक प्रमुख मंत्र्यांना अनेक महिने तुरुंगात रहावं लागलं. याचा दिल्लीच्या निवडणुकीवर परिणाम दिसून आला. भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर अनेकदा आक्रमक असलेला आम आदमी पक्ष बचावात्मक भूमिकेत राहिला. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. आता जनतेच्या दरबारात न्याय मागणार असल्याचं त्यांनी त्यावेळी म्हटलं होतं.
२०११ मधील अण्णा हजारेंच्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाने संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलं होतं. भ्रष्ट्राचार संपवण्यासाठी लोकपाल बीलाची मागणी करण्यात येत होती. दिल्लीच्या रामलीला मैदानावर कित्येक दिवस आंदोलन सुरू होतं. संपूर्ण देश आंदोलनाने व्यापून गेला होता. अण्णा रजारेंसोबत आणखी एक व्यक्ती प्रकाश झोतात होती, ती म्हणजे अरविंद केजरीवाल. डिसेंबरच्या अखेरीस अण्णा हजारे यांनी भ्रष्टाचारविरोधी आंदोलन मागे घेतलं. त्यानंतर अरविंद केजरीवाल यांनीराजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आणि २६ नोव्हेंबर २०१२ रोजी आम आदमी पक्षाची स्थापना करण्याची घोषणा केली.
त्यावेळी केजरीवाल म्हणाले होते, “आम्हाला राजकारणात येण्यास भाग पाडले गेले. आम्हाला राजकारण समजत नाही. आम्ही या देशातील सामान्य लोक आहोत. भ्रष्टाचार आणि महागाईने हैराण झालो आहेत, असं त्यांनी त्यावेळी म्हटलं होतं. त्यानंतर दिल्लीच्या दोन वेळच्या निवडणुकांमध्ये जवळपास ९० टक्के जागांवर विजय मिळवला. दिल्ली मॉडेलची युनेस्कोनेही दखल घेतली. पंजाबमध्ये पूर्व बहुमताचं सरकार स्थापन केलं. गोवा, गुजरातमध्येही आमआदमी पक्षाचे आमदार निवडून आले आणि कोणताही राजकीय अनुभव नसेला पक्ष राष्ट्रीय पक्ष बनला. लोकसभा निवडणुकीत मात्र आम आदमी पक्षाला फारस यश मिळालं नाही.
आम आदमी पक्षाचं सरकार स्थापन झाल्यापासून केंद्र सरकार आणि दिल्ली सरकारमधील संघर्ष देशपातळीवर चर्चेचा विषय बनला आहे. मध्यंतरी मोदी विरुद्ध अरविंद केजरीवाल असं समीकरण बनलं होतं. लोकसभा निवडणुकीत वाराणसीतून आपने पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात निवडणूक लढवली होती. मात्र जवळपास पावणे चार लाख मत फरकांनी पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे त्यांनी संपूर्ण लक्ष दिल्लीवर केंद्रीत केलं. दिल्ली देशाची राजधानी असल्यामुळे भाजपलाही दिल्ली काबीज करण्याची अनेक वर्षांपासूनची मनशा आहे. त्यातूनच संघर्ष वाढत गेला. भाजप संधी शोधत होता आणि त्यातच अरविंद केजरीवाल यांनी मद्य धोरण राबवलं आणि यात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपने केला आणि हा आरोप तडीस नेण्याचा प्रयत्न केला. याच प्रकरणात भाजप-आपमधील संघर्ष टोकाला गेला. अरविंद केजरीवाल, मनिष सिसोदीया यांना तरुंगात जावं लागलं. त्याचा परिणाम दिल्लीच्या राजकारणावर दिसून येत आहे.
एक्झिट पोलने व्यक्त केलेले अंदाज त्याचीच प्रचिती असल्याच जाणकारांच मत आहे. जर एक्झिट पोलचे अंदाज खरे ठरले तर त्याचा देशाच्या राजकारणावर दूरगामी परिणाम दिसून येण्याची शक्यता आहे. भ्रष्टाचारविरोधी आंदोलनातून निर्माण झालेल्या एका पक्षाचा ज्याठिकाणी उदय झाला ती दिल्ली हातातून निसटली तर राजकीय असतित्वासाठी आपला झगडावं लागणार आहे. पंजाबमध्ये आपचं पूर्ण बहुमताचं सरकार असलं तरी मोठी राज्य चालवण्याचा अनुभव खूप कमी आहे. तसंच दिल्लीच्या निवडणुकीचा पंजाबच्या येणाऱ्या निवडणुकांवर परिणाम जाणवणार आहे. आप एक उभरता पक्ष आहे त्यामुळे खुठेतरी या पक्षाच्या राजकीय वाटचालीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मोठं अपयश आलेल्या भाजपला विधानसभा निवडणुकीत न भुतो न भविष्यती यश मिळालं. लाडकी बहीण योजनेचा भाजप आणि महायुतीला फायदा झाला असं मानलं जातं. त्यामुळे दिल्लीतही तिन्ही पक्षांकडून महिला मतदारांना खूश करण्याचा प्रयत्न राहिला. तिन्ही पक्षांनी महिलांसाठी योजना जाहीर केल्या. दरम्यान जसा आपच्या जय-पराजयाचा देशाच्या राजकारणावर परिणाम जाणवेल तसाच भाजपच्या जय-पराजयाचाही परिणाम जावणार आहे.
आगामी काळात बिहारच्या निवडणुका होणार आहे. त्यानंतर उत्तर प्रदेशच्या निवडणुका आहे. राजकीय दृष्ट्या ही दोन्ही राज्य महत्त्वाची मानला जातात. उत्तर भारतात या राज्याच्या राजकारणाचा परिणाम जावणतो. त्यामुळे जर भाजप विजयी झाला तर बिहार आणि उत्तर प्रदेशच्या निवडणुकीमध्ये भाजपसाठी सकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे. तर महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा आहे. जरी आप राजकीय दृष्ट्या तळागाळापर्यंत पोहोचला नसला तर भ्रष्ट्राचारविरोधी आंदोलनामुळे अरविंद केजरीवाल आणि त्यांचा आप पक्ष कोणाला माहिती नाही असं नाही. त्यामुळे महाराष्ट्राच्या निवडणुकांचा निकाल जसा दिल्लीच्या निवडणुकांमध्ये जाणवला तसा तो भाजपसाठी महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थामध्येही जाणवण्याची शक्यता आहे.