
Delhi Parliament March, Rahul Gandhi Detained PM House, Sharad Pawar Jantar Mantar CJP,
Congress Delhi Parliament March: राजधानी दिल्लीत सोमवारी (20 जुलै) संसद मोर्चाच्या पार्श्वभूमीवर दिवसभर तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळाले. संसद भवन आणि जंतर-मंतर परिसरातील रस्त्यांवर आंदोलकांची मोठी गर्दी उसळली होती. काही ठिकाणी आंदोलक आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की व संघर्ष झाल्याची घटना घडली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी काही ठिकाणी लाठीचार्ज करण्यात आला. शेकडो विद्यार्थी आंदोलक गंभीर जखमी झाले. यानंतरही सीजेपीने आंदोलन सुरूच राहणार असल्याचा निर्णय जाहीर केला आहे. या घटनेनंतर देशभरातून संतापाची लाट उसळली आहे.
विद्यार्थ्यांवरील हल्ल्याच्या कालच्या घटनेनंतर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, खासदार प्रियांका गांधी चांगल्याच भडकल्याचे पाहायला मिळाले. विद्यार्थ्यांवर झालेल्या या मारहाणीनंतर आज राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थाबाहेर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळीही मोठा राडा झाला. नरेंद्र मोदी हाय हाय च्या घोषणा करण्यात आल्या. पोलिसांनी काँग्रेस नेत्यासह राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना ताब्यात घेतले. यावेळी काही विद्यार्थीदेखील या आंदोलनात उपस्थित होते.
दुसरीकडे, जंतर-मंतरवर सुरू असलेल्या सीजेपीच्या या आंदोलनात आज राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यादेखील दाखल झाल्या. विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्यानंतर आज शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी अभिजीत दिपके यांची भेट घेतली. यावेळी दोघांमध्येही चर्चा झाली. शरद पवार यांनी विद्यार्थ्यांवरील या हल्ल्याचा जोरदार निषेध नोंदवला.
‘कॉकरोच जनता पार्टी’ने आयोजित केलेल्या संसद मोर्चामुळे सुरक्षेच्या कारणास्तव संसद भवन परिसरातील अनेक मेट्रो स्थानके तात्पुरती बंद करण्यात आली होती. मात्र, यानंतरही मोठ्या संख्येने आंदोलक संसद आणि जंतर-मंतर परिसरात दाखल झाल्याने संपूर्ण परिसरात वाहतूक आणि सुरक्षा व्यवस्थेवर ताण निर्माण झाला.
पोलिसांनी मोर्चासाठी परवानगी दिलेली नसतानाही आंदोलकांनी संसदेकडे कूच सुरू ठेवली. यामुळे अनेक ठिकाणी आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी बॅरिकेड्स उभारले. काही ठिकाणी आंदोलकांनी अडथळे हटवण्याचा प्रयत्न केल्याने पोलिस आणि आंदोलकांमध्ये संघर्ष झाला.
कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी काही ठिकाणी बळाचा वापर केला. आंदोलकांना पांगवण्यासाठी लाठीचार्ज करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस आणि निमलष्करी दल तैनात करण्यात आले असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.
संसदेचे अधिवेशन सुरू असल्याने राजधानीत सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली असून, आंदोलनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर प्रशासनाचे लक्ष केंद्रित आहे.