नवी दिल्ली: दोन दिवसांपूर्वी आम आदमी पक्षाच्या नेत्या आतिशी मार्लेना यांनी मंत्रिमंडळासह दिल्लीच्या आठव्या मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यानंतर आज (23 सप्टेंबर) दुपारी 12 वाजता त्या दिल्ली सचिवालयात मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारतील. यासोबतच त्या मंत्रिमंडळाची बैठक घेऊन काही महत्त्वाचे निर्णय घेण्याची शक्यता आहे. दरम्यान, 26 आणि 27 सप्टेंबर रोजी दिल्ली विधानसभेचे अधिवेशन होणार असल्याचीही माहिती आहे.
माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सरकारच्या काळात आतिशी मार्लेना यांच्याकडे 13 खात्यांच्या कारभार होता. जो त्यांनी आजही स्वत:कडे कायम ठेवला आहे. यात शिक्षण, महसूल, वित्त, वीज आणि सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) यांचा समावेश होतो. आतिशी मार्लेना आज पदभार स्वीकारण्याची शक्यता आहे. इतर मंत्रीही उद्या पदभार स्वीकारण्याची शक्यता आहे.
हेही वाचा: देशातील ही 6 मंदिरे त्यांच्या प्रसादासाठी आहेत प्रसिद्ध, नक्की आस्वाद घ्या!
अतिशी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात प्रलंबित प्रकल्प, योजना आणि नवीन उपक्रमांची एक लांबलचक यादी आधीच प्रलंबित आहे, जे पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी काम सुरू करण्याचे नियोजित आहे.
आपचे ज्येष्ठ नेते सौरभ भारद्वाज यांनी शनिवारीच मंत्रिपदाची सूत्रे स्वीकारली होती. आतिशीनंतर भारद्वाज यांच्याकडे आठ विभागांची सर्वाधिक जबाबदारी आहे.
आतिशी सरकारमध्ये नवे मंत्री बनलेले मुकेश अहलावत यांच्याकडे कामगार, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती, रोजगार आणि जमीन आणि इमारत या खात्यांचा कार्यभार आहे.
आपचे दिल्लीचे प्रभारी गोपाल राय यांच्याकडे विकास, सामान्य प्रशासन विभाग, पर्यावरण आणि वन खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. केजरीवाल सरकारमध्येही राय यांच्याकडे या खात्यांची जबाबदारी होती.
हेही वाचा: विधानसभेपूर्वी अजित पवार महायुतीतून बाहेर पडणार; महायुतीच्या गोटात नक्की चाललंय काय?
नजफगडमधील आप आमदार कैलाश गेहलोत यांच्या जबाबदारीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.पूर्वीप्रमाणेच ते परिवहन, गृह, प्रशासकीय सुधारणा, महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या जबाबदाऱ्या पार पाडतील.
दिल्लीच्या बल्लीमारन विधानसभा मतदारसंघातून दोन वेळा आमदार राहिलेल्या इम्रान हुसैन यांना अन्न आणि पुरवठा आणि निवडणूक खात्याची जबाबदारी मिळाली आहे. यापूर्वीही त्यांच्याकडे हाच विभाग होता.