
आजकाल प्रत्येकजण मोबाईलचा वापर करत असून स्मार्टफोन हा जीवनाचा अविभाज्य भाग बनत चालला आहे. मोबाईलमुळे अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत यात दुमत नाहीच. पण त्याचबरोबर त्याचे धोकेही वाढले आहेत. अनेकदा कामानिमित्त युजर्स त्यांची महत्त्वाची माहिती मोबाईलमध्ये सेव्ह करतात. पण, ही माहिती सुरक्षित नसली तर मोबाईल हॅकिंगचा धोका सुद्धा वाढतो.हॅकर्स लोकांना आपल्या जाळ्यात कसे अडकवतात हे जाणून घेऊया.
सॉफ्टवेअरच्या मदतीने तुमचा फोन हॅक करणे ही सर्वात जास्त वापरली जाणारी पद्धत आहे. यासाठी हॅकर्स एकतर तुमच्या फोनमध्ये असे सॉफ्टवेअर टाकतात किंवा एखादा फिशिंग मेल वापरतात. यासाठी हॅकर्स दोन प्रकारचे सॉफ्टवेअर वापरतात. एक अतिशय लोकप्रिय नाव ट्रोजन आहे. आणि दुसरा मार्ग म्हणजे की-लॉगिंग.
की लॉगिंगबद्दल सांगायचे झाल्यास, ते स्टॉकरसारखे कार्य करते. तुमच्या फोनमध्ये असलेल्या या प्रकारच्या सॉफ्टवेअरच्या मदतीने तुम्ही काय टाइप करत आहात, फोन स्क्रीनवर तुम्ही कुठे टॅप करत आहात आणि फोनवर तुम्ही कोणाशी बोलत आहात हे हॅकर्सना कळते.
अशा सॉफ्टवेअरला ट्रोजन म्हणतात, ज्याचे काम फोनमधून आवश्यक डेटा चोरणे आहे. या प्रकारच्या मालवेअरच्या मदतीने हॅकर्स तुमच्या फोनमधून क्रेडिट कार्ड तपशील, वैयक्तिक माहिती आणि बरेच काही चोरू शकतात.
फोन हॅक होण्याची ही काही चिन्हे आहेत
तुमचा फोन कोणीतरी हॅक केला आहे असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तो सहज तपासू शकता. वास्तविक, त्याचे काही सिग्नल तुमच्या फोनमध्ये दिसतील.
हॅक झाल्यावर तुमच्या फोनची बॅटरी झपाट्याने संपते.
तुमचा स्मार्टफोन हळू काम करेल आणि लवकरच गरम होईल.
हँडसेटमधील अनेक ॲप्स अचानक बंद होतील. किंवा फोन बंद होऊन आपोआप चालू होईल.
मोबाईलमधला इंटरनेट डेटा झपाट्याने कमी होईल. यामध्ये तुम्हाला अतिरिक्त एसएमएस आणि इतर शुल्क देखील दिसेल.
लोकं कसे फसतात?
याचा सर्वात सोपा आणि लोकप्रिय मार्ग म्हणजे फिशिंग अटॅक. त्याच्या नावावरूनच या प्रकारच्या हल्ल्याचा अंदाज येऊ शकतो. ज्याप्रमाणे मासे आमिषाने अडकतात, त्याचप्रमाणे हॅकर्स फिशिंग मेल, ऑफर किंवा एसएमएसद्वारे लोकांना अडकवतात. हॅकर्स मेल किंवा मेसेजमध्ये अज्ञात लिंक पाठवतात आणि तुम्ही त्यावर क्लिक करताच तुमच्या फोनमध्ये मालवेअर इन्स्टॉल होतो.
दुसरा मार्ग म्हणजे ब्लूटूथ हॅकिंग. व्यावसायिक हॅकर्स अशा उपकरणांचा वापर करतात, जे असुरक्षित उपकरणांच्या शोधात असतात. जर तुमच्या फोनचे ब्लूटूथ नेहमी चालू असेल तर हॅकर्स तुमचा फोन 30 फूट अंतरावरून हॅक करू शकतात.